बेळगाव लाईव्ह : महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप गुरुवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळावेत यासाठी अर्थ विभागाकडून निधी मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन बेळगावसह राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये छेडले आहे. बेंगळूर येथील फ्रीडम पार्कवर आंदोलन सुरू असून बेळगाव महानगरपालिकेतदेखील कर्मचाऱ्यांनी बुधवारीदेखील कामबंद आंदोलन केले.
त्यामुळे बुधवारीदेखील महापालिकेचे सर्व विभागातील कामकाज ठप्प होते. राज्य महापालिका कर्मचारी संघटनेने मंगळवारी एक दिवस आंदोलनाचा निर्णय घेतल्याने त्यात सहभागी होण्यासाठी विविध महानगरपालिकांतील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सोमवारीच बेंगळूरला रवाना झाले.
त्याचबरोबर बेळगाव महापालिकेतही एक दिवस कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत मनपा आयुक्त आणि महापौरांना कल्पना देण्यात आली होती. या आंदोलनादरम्यान “आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही,” असे कर्मचाऱ्यांनी ठामपणे सांगितले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अनेक सुविधा महापालिका कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाहीत. त्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यभरातील महापालिका कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्य महापालिका कर्मचारी संघटनेच्या सूचनेनुसार सर्व कर्मचारी मंगळवारी सामूहिक रजेवर गेले. राज्य सरकारने मागण्यांची पूर्तता न केल्यास बेंगळूर येथील आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कर्मचारी संपावर असल्याने महानगरपालिका कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. बुधवारीदेखील नेहमीप्रमाणे बेळगाव महानगरपालिकेत विविध कामांसाठी नागरिकांची गर्दी होत होती. मात्र, सर्वच विभागात अधिकारी व कर्मचारी नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले. कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याने याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला. त्यामुळे गुरुवारपासून तरी परिस्थिती पूर्वपदावर येणार का, याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.


