बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलिसांनी गुरुवारी केलेल्या धडक कारवाईत, चरसची अवैध विक्री करणाऱ्या चार जणांना आणि गांजाचे सेवन करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. एकूण पाच स्वतंत्र प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी सुमारे रु. ४.७६ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खडेबाजार पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सरदार मैदानाजवळ छापा टाकला. या छाप्यात अजर मोह जाहिद (२७, रा. हरिजन वस्ती, दिल्ली, सध्या सुभाष नगर, बेळगाव), इब्राहिम अब्दुलखादर घिवाले (२४, रा. सदाशिव नगर, बेळगाव), दानिशखान युसुफखान कित्तूर (२७, रा. पोंडा, गोवा, सध्या नानावडी, बेळगाव) आणि सुनील शिवानंद संगनायकर (२२, रा. हनुमान नगर, बेळगाव) यांना अटक करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी रु. ४,००,०००/- किमतीचे ८२५ ग्रॅम चरस, दोन आयफोन (प्रत्येकी रु. २०,०००/-), एक विवो मोबाईल (रु. ५,०००/-), एक वनप्लस मोबाईल (रु. ५,०००/-), एक हिरो होंडा कंपनीची दुचाकी (रु. १०,०००/-), एक डिओ स्कूटर (रु. १०,०००/-) आणि रु. ६,०००/- रोख रक्कम असा एकूण रु. ४,७६,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. खडेबाजार पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
याचप्रमाणे मार्केट पोलीस आणि माळमारुती पोलिसांनी केलेल्या पेट्रोलिंगदरम्यान गांजाचे सेवन करणाऱ्या चार जणांना वेगवेगळ्या ठिकाणी अटक केली. मार्केट पोलिसांनी केलेल्या कारवाईत, रमेश चंद्रकांत अरळीकट्टी (३४, रा. संती ओणी, बडाल अंकलगी, सध्या गांधी नगर, बेळगाव) याला केंद्रीय बस स्थानकाजवळ, वकारअहमद रफीक नायकवाडी (३०, रा. बारावी क्रॉस, उज्ज्वल नगर, बेळगाव) याला कसाई गल्लीजवळ, आणि रोशनजमीर अब्दुलरहूप मुल्ला (२५, रा. दुसरी क्रॉस, उज्ज्वल नगर, बेळगाव) याला कोतवाल गल्लीजवळ गांजाचे सेवन करताना पकडण्यात आले. या तिघांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माळमारुती पोलिसांनी केलेल्या कारवाईत, साहिल खताल ददवाडकर (२६, रा. नवीगल्ली, सध्या अमन नगर, बेळगाव) याला वंटमूरी कॉलनी क्रॉसजवळ गांजाचे सेवन करताना अटक करण्यात आली. साहिलविरुद्ध माळमारुती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व प्रकरणांमध्ये पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.


