बेळगाव लाईव्ह :चार दिवसांपूर्वी मंडोळी (ता. जि. बेळगाव) येथील काजू फॅक्टरीमध्ये झालेल्या चोरीचा छडा लावण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून त्यांनी 3 लाखाहून अधिक किमतीच्या 2,249 किलो काजूसह एक गुड्स वाहन आणि इतर साहित्य असा एकूण 7 लाख 27 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव महादेव तुकाराम पाटील (वय 30 रा. उचवडे, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे आहे. मंडोळी येथील बाळासाहेब कृष्णा पाटील यांच्या काजू फॅक्टरीमध्ये गेल्या शनिवारी पाच जुलै रोजी चोरीची घटना घडली होती.
याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद होऊन पोलीस तपास सुरू होता. त्या अनुषंगाने काल बुधवारी बामणवाडी नाक्याजवळ पोलिसांना 42 पोती काजू घेऊन जाणारा अशोक लेलँड कंपनीचा गुड्स टेम्पो (क्र. केए 22 सी 9387) आढळून आला. संशयावरून टेम्पो अडवून टेम्पो तपासता असता त्यामध्ये काजूची पोती आढळून आली.
पोलिसांनी टेम्पो चालक महादेव याची चौकशी केली असता टेम्पोतील तो काजूचा साठा मंडोळी येथून चोरल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी महादेव तुकाराम पाटील याला अटक करून मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 3,71000 रुपये किमतीच्या कच्च्या काजूची 42 पोती, 4,800 रुपये किमतीची लाकूड तोडण्याची मशीन, 1500 रुपयांची ताडपत्री आणि 3,50,000 रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा गुड्स टेम्पो अशा एकूण 7,27,300 रुपये किमतीच्या मुद्द्यामालाचा समावेश आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त, दोन्ही पोलीस उपायुक्त आणि बेळगाव ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, उपनिरीक्षक लकाप्पा जोडट्टी, संतोष दळवाई, श्वेता, हवालदार एस. व्ही. नायकवाड, सी. एस. सिंगारी, एस. बी. उप्पार, एम. बी. कोटबागी, एम. एम. नाईक, एस. एस. हंचनमनी, बी. एस. पडनाड, आनंद कोटगी, शिवशंकर, ए. एम. रुपनवर, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की आदींनी उपरोक्त कारवाई केली.


