बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरांमध्ये परिवहन मंडळाचे बरेच बस चालक बस चालवताना मोबाईल वापरण्याचा अपघाताला निमंत्रण देणारा प्रकार करत आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोबाईल न वापरण्याबद्दल संबंधित बस चालकांना चांगली समज देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे.
हत्तरगी येथील मल्लिकार्जुन आयटीआय कॉलेजचे शिक्षक असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले कॉलेजला जाण्यासाठी आज सकाळी 9.30 वाजता बसने प्रवास करत होते. त्यावेळी महामार्गावर बसचालक बस चालवताना मोबाईल फोन वापरत होता.
आधीच महामार्गावर रस्त्याची कामे सुरू असताना बस चालवत चालक फोनवर बोलत असल्याचे पाहून प्रसाद चौगुले यांनी आसनावरून उठून त्याच्याकडे जात बस रस्त्या शेजारी थांबवून मोबाईलवर बोलण्यास सांगितले.
या पद्धतीने बस चालवत चालक मोबाईलवर बोलत राहिला आणि जर काही अपघात झाला तर जबाबदार कोण? असा सवाल प्रसाद चौगुले यांनी केला आहे. तसेच बेळगाव शहरातील बरेच बस चालक बस चालवताना मोबाईल फोन वापरतात.
हा एक प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) व पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोबाईल न वापरण्याबद्दल संबंधित बस चालकांना चांगली समज देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चौगुले यांनी केली.




