बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून सीमा वादावर काम करण्यासाठी तज्ञ समितीची पुनर्रचना झाली.हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांची पुनर्नियुक्तीसह कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांची सहअध्यक्षपदी तर दैनिक पुढारीचे संपादक प्रताप सिंह जाधव या कोल्हापूरच्या प्रभावशाली व्यक्तींची तज्ञ समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय बेळगाव मधून माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, अध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती त्याच बरोबर ॲड महेश बिर्जे ॲड राजाभाऊ पाटील यासह महाराष्ट्र शासनाच्या दोन अधिकाऱ्यांनाही तज्ञ समितीत जागा देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत झालेल्या तज्ञ समितीत देखील धैर्यशील माने हेच अध्यक्ष होते मात्र माने यांनी आपल्या कार्यकाळात तज्ञ समितीची एकच बैठक घेतली होती त्या बैठकीत फक्त आरोग्य योजना सीमा भागात जाहीर करून तोंडाला पाने पुसण्याचे काम केले होते त्या व्यतिरिक्त सीमा लढ्यासाठी किंवा सुप्रीम कोर्टातील याचिके संदर्भात म्हणावे तेवढे मोठे प्रभावी काम केले नव्हते. एकंदर सीमा वादाच्या मूळ लढ्याला माने यांच्या कारकीर्दीचा विशेष असा फायदा झाला नाही त्यांच्या अकार्यक्षम कारकिर्दीमुळे महाराष्ट्र शासनान धनंजय महाडिक या प्रभावशाली व कार्यतत्पर खासदारांची सहअध्यक्ष पदी निवड करून जोड दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विशेष स्थान असलेले प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे प्रतापसिंह जाधव यांची तज्ञ समितीत नियुक्ती व्हावी यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती प्रयत्न समिती आणि नगरसेवक प्रयत्नशील होते समितीच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून प्रतापसिंह जाधव यांची या समितीत सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रताप सिंह जाधव यांच्या नियुक्तीने सीमा लढ्याला बळ तर नक्की मिळणारच आहे याशिवाय लढा महाराष्ट्रात जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, आणि सीमा वासियांच्या दृष्टीने हा एक आशेचा किरण म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे. प्रतापसिंह जाधव यांची आजवरची कारकीर्द पाहता त्याचबरोबर त्यांचे प्रभावी वर्तमानपत्राचे संपादक म्हणून असणारे वजन यातून त्यांनी पार पाडलेल्या अनेक जबाबदाऱ्या यांचा इतिहास पाहता सीमा प्रश्नाला अधिक गती येणे शक्य झाले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना निवेदन देत तज्ञ समितीवर माजी मंत्री जयंत पाटलांची नियुक्ती करा अशी मागणी करण्यात आली होती शरद पवार या संदर्भात फडणवीस यांच्याशी बोलणार देखील होते मात्र तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती करत अप्रत्यक्षरीत्या मध्यवर्ती समितीची मागणी फडणवीस यांनी अमान्य केली आहे. यापूर्वी बरीच वर्ष हे पद सत्ताधारी पक्षात नसताना देखील माजी मंत्री कै. एन डी पाटील यांनी भूषविले होते मात्र मागील कार्य काळापासून तज्ञ समितीचे अध्यक्ष पद हे सत्ताधारी पक्षातील सदस्य दिलेले आहे. या तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांची निवड झाली परंतु कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांची सहअध्यक्ष नियुक्त करून मागे झालेल्या कालखंडातील धैर्यशील माने यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीवर काहीसे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी तज्ञ समितीची पुनर्रचना करताना जाणीवपूर्वक प्रभावशाली व्यक्तिमत्वे या तज्ञ समितीशी जोडून बेळगाव प्रश्नावर सकारात्मकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रश्नाची जाण असून सुद्धा धैर्यशील माने व शंभूराजे देसाई, चंद्रकांत दादा पाटील असा संच बांधूनही त्यांच्या कडून अडीच वर्षात म्हणावी तितकी चालना या प्रश्नाला आणि दिल्लीतील याचिकेला मिळाली नाही. शंभूराज देसाई आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत बेळगाकडे पाठ फिरवल्यामुळे सीमा भागातील जनतेत तत्कालीन महाराष्ट्र शासनाबद्दल काहीसा रोष निर्माण झाला होता. चंद्रकांत दादा पाटील यांच्या भूमिके विषयी नेहमीच बेळगावात प्रश्नचिन्ह उभे आहेत, गोकाक मध्ये त्यांनी म्हटलेलं ते गाणं आणि त्यानंतर उफाळलेला वाद आजही सीमा वासियांच्या मनात ताजा आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिके विषयी नेहमीच साशंकता व्यक्त केली जायची परंतु यावेळी फडणवीस यांनी तज्ञ समितीची पुनर्रचना करताना काही प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांचा समावेश करून आपल्यावरील सीमा वासियांचा असलेला रोष कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तज्ञ समिती वरील शिवसेनेचा प्रभाव कमी करत भाजपाचा प्रभाव वाढवण्याचे कामही देवेंद्र फडणवीस यांनी चालाखीने केले आहे. देशातील राजकीय स्थिती पाहता भाजपचा प्रभाव देशभर वाढत असताना तज्ञ समिती वर भाजपचा प्रभाव असेल तर बेळगाव सीमा प्रश्नाला प्रभावशाली दिशा मिळेल असेही काही तज्ञांच्या मते मत व्यक्त केले जात आहे. नेहमी प्रमाणे राजकीय खेळी,शिंदे गटाचा प्रभाव कमी करणे हे देखील राजकारण यात घडले असण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.



