बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे झालेल्या मोटरसायकल चोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) रोहन जगदीश, पोलीस उपायुक्त (गुन्हे व वाहतूक) निरंजन राजे अरस आणि बेळगाव ग्रामीण उपविभागाचे सहायक पोलीस आयुक्त बी.एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली, हिरेबागवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.के. होळेन्नवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
१४ जुलै २०२५ रोजी तपास करत असताना पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची ओळख संतोष शिवप्पा ऊर्फ शिवानंद बेविनकोप्पा (वय ३०, रा. इंचल, ता. सवदत्ती, जि. बेळगाव) अशी पटली. संशयास्पद स्थितीत त्याला ताब्यात घेण्यात आले असता, त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आढळून आली.
त्याने चोरीची मोटरसायकल घेऊन जात असताना संशयास्पदरीत्या सापडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. हिरेबागवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या मोटरसायकलचा छडा लागला असून, आरोपीच्या चौकशीदरम्यान बैलहोंगल तालुक्यातील नागणूर, नेसरगी तसेच हुबळी आणि बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर येथील मोटरसायकल चोरीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.
या आरोपीच्या ताब्यातून अंदाजे २,३५,००० रुपये किमतीच्या एकूण ५ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त केलेल्या दुचाकींमध्ये विविध कंपन्यांच्या आणि मॉडेल्सच्या मोटरसायकलचा समावेश आहे.
वरील आरोपीला शोधून अटक करण्यात हिरेबागवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.के. होळेन्नवर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. येरगोंप, पोलीस उपनिरीक्षक बी.के. मिटगार आणि कर्मचारी एम.आय. तुरमरी, प्रभाकर भूशी, वाय.एम. मुनावळ्ळी, प्रीतम कोचेरी, महांतेश हूगार, आर.एस. केळगीनामनी यांच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले आहे.


