बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील सुळगा, हिंडलगा, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची आदी गावांजवळ बेळगाव -वेंगुर्ला रस्त्याची खड्डे पडून दुर्दशा झाली असल्यामुळे या रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी, अशी मागणी उचगाव विभाग श्रीराम सेना हिंदुस्थान, गावकरी आणि वकिलांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
उचगाव विभाग श्रीराम सेना पदाधिकारी, गावकरी आणि वकिलांनी आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी वेंगुर्ला रोडवर पडलेले खड्डे दुरुस्ती करा व रोड नव्याने करा अशी मागणी करून खराब रस्त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.
निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव -वेंगुर्ला रस्त्याच्या समस्येकडे त्वरित लक्ष घालण्याचे
निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले जातील. त्यानुसार ते पाहणी करून खड्डे बुजून सध्या पॅचवर्क करतील आणि पाऊस संपल्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल, असे आश्वासन दिले.
बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावर सुळगा, हिंडलगा, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची आदी गावांजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून उपरोक्त गावांच्या नागरिकांची बेळगावला दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सध्याच्या पावसामुळे वेंगुरला रोड पूर्णपणे नादुरुस्त झाला असून मोठे मोठे खड्डे पडल्याने धोकादायक बनला आहे. परिणामी या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून दररोज अपघात घडत आहेत तेव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा ही विनंती अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी ॲड. आण्णासाहेब घोरपडे, ॲड. मोहन नंदी, ॲड. महेंद्र कांबळे, ॲड. महादेव शहापूरकर, ॲड. बसवराज कामती, ॲड. मारुती कामाण्णाचे, ॲड. शरद देसाई, ॲड. निशा शहापूरकर, ॲड. राधे शहापूरकर, प्रफुल्ल चौगुले, परशराम मन्नुरकर, ओमकार नाईक, संदीप पाटील, श्रीकांत चौगुले, सचिन कदम, खाचू सावंत, यल्लाप्पा भडांगे, सुहास बांडगी आदी बरेच गावकरी उपस्थित होते.


