बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सुरू केलेल्या पोलिसांच्या अँटीस्टॅबिंग स्क्वाडने काल सोमवारी सायंकाळी श्रीनगर येथे एका युवकाला अटक करून त्याच्या जवळील धारदार जांबिया जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आनंद परशुराम बजंत्री (वय 21, घर नं. 8, मुस्लिम गल्ली, श्रीनगर बेळगाव) असे आहे. अलीकडे शहरात चाकूने वार करण्याच्या अथवा भोसकण्याच्या वाढलेल्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पोलिसांच्या अँटीस्टॅबिंग स्क्वाड कार्यरत केले आहेत.
कायदा सुव्यवस्थेसह समाजातील शांती बिघडू नये यासाठी या स्क्वाडकडून सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद व्यक्तींना अडवून चौकशी करून त्यांची झडती घेतली जात आहे.

सदर स्क्वाडपैकी माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यू. टी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील अँटीस्टॅबिंग स्क्वाडने काल सोमवारी सायंकाळी 4:15 वाजता संशयावरून आनंद बजंत्री याला अडवून चौकशी केली.
तसेच त्याची व त्याच्या वाहनाची झडती घेतली असता आनंद याने धारदार जांबिया कपड्यात गुंडाळून आपल्या पॅन्टमध्ये ठेवल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी बजंत्री याला अटक केली असून याप्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


