बेळगाव लाईव्ह :भरधाव टाटा इंट्रा मालवाहू वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या अपघातात त्या वाहनाने रस्त्याशेजारी सुरक्षा कठड्याला जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी हिरेबागेवाडी जवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली. दैव बलवत्तर म्हणून अपघातात चालकाचे प्राण वाचले.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, टाटा इंट्रा मालवाहू वाहन बेळगावहून धारवाडच्या दिशेने जात असताना हिरेबागेवाडी जवळ बडेकोळ्ळामठ परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट राष्ट्रीय महामार्ग 4 वरील संरक्षक भिंतीला आदळली. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आवश्यक कार्यवाही करत अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवले. गेल्या कांही महिन्यांपासून याच ठिकाणी अपघातांची संख्या वाढली आहे. ज्यामध्ये काही लोकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे.
बडेकोळ्ळामठजवळचा महामार्गाचा भाग तीव्र वळणांचा आणि उताराचा असल्याने भरधाव वेगातील वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिसरात पोलीसांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या असल्या तरी अपघातांचे प्रमाण घटलेले नाही. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत उपरोक्त अपघाताची घटना घडली आहे.




