बेळगाव लाईव्ह :भाजीवाहतूक करणाऱ्या भरधाव कंटेनरने रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात कंटेनरचा क्लीनर जागीच ठार, तर चालक जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी रात्री बेळगाव -जांबोटी रस्त्यावर किणये गावानजीक घडली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नांव मधु कल्लाप्पा अष्टेकर (वय 40, रा बिजगर्णी) असे असून जखमीचे नांव शुभम चौगुले (रा. बिजगर्णी) असे आहे. याबाबतची माहिती अशी की, काल मंगळवारी रात्री भाजी भरलेला एक कंटेनर (क्र. केए 22सी9423) बेळगावहून गोव्याच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी जांबोटी रस्त्यावर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कंटेनर चालकाला किणये गावाजवळ रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकचा (क्र. केए 22 सी 6461) अंदाज आला नाही. परिणामी कंटेनरची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात कंटेनर चालक शुभम चौगुले हा किरकोळ जखमी झाला असला तरी त्याचा क्लीनर मधु अष्टेकर जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस आणि घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला.

