बेळगाव लाईव्ह : आसाममध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या घरांवर प्रशासनाकडून चालवण्यात येत असलेल्या बुलडोझर कारवाईचा निषेध करत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने बेळगावात तीव्र निदर्शने केली. संविधानाच्या विरोधात चाललेल्या या कारवाईवर एसडीपीआयने गंभीर आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आसाम राज्यात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या नागरिकांच्या घरांवर मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडून कारवाई होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (SDPI) बेळगावातील कित्तूर चन्नम्मा चौकात आंदोलन केले.
या निदर्शनात सहभागी झालेल्या एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध केला. ही लढाई अन्यायाविरोधात असून, ही लोकशाहीतील हक्कांच्या संरक्षणासाठीची भूमिका आहे.
आसाममध्ये हेमंत बिस्वा सरमांच्या सरकारकडून रातोरात लोकांना बेघर करून त्यांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे असा आरोप आंदोलकांनी केला. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला, तो कोणत्याही धर्माचा असो, जगण्याचा हक्क दिला आहे. परंतु आज अल्पसंख्याकांवर केवळ त्यांची ओळख पाहून ही निर्दय कारवाई केली जात आहे याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
अल्पसंख्याक समाजाला दुय्यम नागरिक म्हणून वागवून, त्यांच्या धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालवून त्यांना संपवण्याचे प्रयत्न होत आहेत. मशिदी, दर्गे, ईदगाह यांचे उद्दिष्ट्य काय आहे, असा प्रश्न उपस्थित करत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या निदर्शनात अनेक कार्यकर्त्यांनी सामील होऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संविधानिक हक्क आणि मानवी मूल्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांनी या कारवाईला थांबवण्याची मागणी केली.



