बेळगाव लाईव्ह :गेल्या 2016 नंतर आजपर्यंत मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची निवडणुक झाली नसल्यामुळे मनमानी प्रशासकीय कारभार सुरू आहे. भ्रष्टाचार माजण्या बरोबरच या भागाचा हवा तसा विकासही झालेला नाही. तेंव्हा मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची निवडणुक ताबडतोब घेण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे सरकारकडे करण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाच्या (आप) बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने त्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून केलेली मागणी सरकार दरबारी मांडली जाईल असे आश्वासन दिले.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आम आदमी पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, राज्य सरकारने मच्छे -पिरनवाडी ग्रामपंचायतीला पट्टणपंचायतीचा दर्जा दिल्यानंतर 2016 मध्ये पहिल्यांदा या पंचायतीची निवडणुक झाली होती. त्यानंतर तत्कालीन लोकनियुक्त सभागृहाचा कालावधी गेल्या 2021 मध्ये समाप्त झाला. पुढे त्यानंतर आजतागायत निवडणूक घेण्यात आलेली नाही. त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
मच्छे आणि पिरनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असून त्यांच्याद्वारे सरकारला मोठा महसूल मिळत असतो. या भागाची लोकसंख्या देखील एक -दिड लाखाच्या जवळपास आहे. सध्या मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे.
लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असतो. पंचायतीमध्ये भ्रष्टाचार वाढला असून नागरिकांची पंचायतीशी संबंधित कोणतीही कामे होईनाशी झाली आहेत. त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षात ज्या हिशोबाने या भागाची प्रगती व्हावयास हवी होती ती देखील झालेली नाही.
तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे. सरकारने पुढील महिन्यात या भागातील चार पट्टण पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यांच्यासोबतच मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची निवडणूक देखील घेतली जावी, अशी आमची मागणी आहे, असे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज निवेदन सादर करतेवेळी आम आदमी पक्षाचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.


