बेळगाव लाईव्ह : ‘मेंढ्या चारण्यासाठी ये’ असे वारंवार सांगितल्याने संतापलेल्या धाकट्या भावानेच आपल्या मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयताच्या धाकट्या भावाला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हट्टीआलूर येथील रहिवासी सुरेश बीरप्पा कमती यांनी दिनांक ०९ मे २०२५ रोजी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचा मुलगा रायप्पा सुरेश कमती (वय २८, रा. हट्टीआलूर) हा दिनांक ०८ मे २०२५ रोजी मेंढ्या चारण्यासाठी गेला असता, दुपारी १:३० ते सायंकाळी ६:३० दरम्यान पाश्चापूर गावच्या हद्दीतील एका मोकळ्या जागेत अज्ञाताने त्याची हत्या केली होती. अज्ञाताने त्याच्या डोक्यावर दगड मारून गंभीर जखमी करत त्याला ठार केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.
या खुनाच्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, बेळगाव जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमारी श्रुती एन.एस. आणि आर.बी. बसरगी, तसेच गोकाक उपविभागाचे डी.एस.पी. रवी डी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी एक विशेष तपास पथक तयार केले. पी.एस.आय. एस.के. मन्निकेरी आणि कर्मचारी श्रीशैल पुजेरी, एस.एम. चौगला, सतीश रेड्डी, सुनील चंद्रगी, एल.बी. हमानी यांचा या पथकात समावेश होता. या पथकाने खुनाच्या या प्रकरणाला आव्हान म्हणून स्वीकारले आणि एक महिना सर्व बाजूंनी कसून तपास केला.
प्रबळ पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी मयताचा धाकटा भाऊ बसंतराज सुरेश कमती (वय २४, रा. हट्टीआलूर) याला अटक करून चौकशी केली. चौकशीदरम्यान, आरोपी बसंतराजने कबूल केले की, त्याचा मोठा भाऊ रायप्पा त्याला वारंवार मेंढ्या राखायला जाण्यास सांगून त्रास देत होता. यामुळे त्याच्या नोकरी करण्याच्या इच्छेत अडथळा येत होता आणि आपला भाऊ आपल्याला कायमस्वरूपी मेंढ्या राखायला लावणार असे त्याला वाटले.
याच विचारातून त्याने आपल्या भावाला संपवण्याचा निर्णय घेतला. दिनांक ०८ मे २०२५ रोजी, बसंतराजने घरातून मिरची पूड आणली आणि रायप्पा शेतात मोबाईल बघत बसला असताना, त्याच्या मागून जाऊन त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर दगडाने त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर अनेक वेळा जोरदार वार करून त्याची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
तपास अधिकाऱ्यांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली असून, आरोपीला माननीय न्यायालयात हजर केले आहे. या तपास पथकाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे खुनाचे गूढ उकलले आहे.


