बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटवरील वाहतूक आजपासून पुढील एका वर्षासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी बहुप्रतिक्षित रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. यामुळे आगामी एक वर्ष म्हणजेच १९ जून २०२६ पर्यंत या मार्गावरून कोणत्याही प्रकारच्या वाहनांना ये-जा करता येणार नाही.
रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरळीत पार पडावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील आणि पी.एस.आय. महांतेश मिर्जे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आजपासूनच वाहतूक थांबवून त्याबाबतचे सूचना फलकही लावले आहेत. यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे.
अनगोळहून बेमकोकडे जाणाऱ्या वाहनांसाठी डी.व्ही.एस. चौक, हरीमंदिर मार्ग, अनगोळ नाका, तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपूल आणि खानापूर रस्त्याचा वापर करून इच्छित स्थळी पोहोचता येईल. तसेच, खानापूर रस्त्यावरून बेमको क्रॉसकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपूल वापरणे सोयीस्कर राहील, असे शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून आणि पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चौथ्या रेल्वे गेटवर २५९ मीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. हा मार्ग दुहेरी असून, दोन्ही बाजूंनी फूटपाथ आणि सर्व्हिस रोडची सोय असणार आहे. रेल्वे मंडळाचे अभियंता नागराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे काम १२ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या भुयारी मार्गामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.