चुकीची माहिती अन् मराठी शाळेसाठी ग्रामस्थ आक्रमक

0
7
 belgaum

बेळगाव लाईव्ह : चुकीची माहिती प्रसारित झाली आणि त्यातून गैरसमज निर्माण झाला आणि त्यामुळेच ग्रामस्थांनी ग्रामपंचायत वर मोर्चा काढला पण ग्रामपंचायत अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले त्यामुळे ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन झाले आणि होणारा संभाव्य संघर्ष टळला. उचगाव गावात सोमवारी या त्या संदर्भात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

उचगाव येथील ग्रामस्थांनी सरकारी मराठी शाळा वाचवण्यासाठी ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा काढला. ‘खाजगी शाळा बंद पडल्या तरी चालतील, पण शासकीय शाळा टिकल्याच पाहिजेत,’ या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम होते. ग्रामपंचायतीत शैक्षणिक निधी परत पाठवल्याची चुकीची माहिती पसरल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे यांनी शैक्षणिक निधीबाबत स्पष्टीकरण दिले.

ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे यांनी शैक्षणिक शासकीय निधी संदर्भात स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, “निधी परत पाठवण्याबाबत किंवा आठवीचा वर्ग बंद करण्यासंदर्भात कोणताही ठराव झालेला नाही.” शैक्षणिक निधीतून विविध विकास कामांची सुरुवात झाली असून, काही माध्यमांमधून चुकीच्या बातम्या गेल्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

बाळासाहेब देसाई यांनी माहिती दिली की, “मराठी शाळा आणि सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने एकमताने ठराव मंजूर झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी गावात सरकारी शाळा नको असा ठराव झाल्याचे खोटे आणि चुकीचे वृत्त समाजमाध्यमांवर प्रकाशित झाले होते. मात्र, असा कोणताही ठराव ग्रामपंचायतीत झाला नसून ग्रामस्थांना गावात मराठी शाळा आणि सरकारी शाळा यांची नितांत गरज आहे. सरकारी शाळेला पाठिंबा देण्याचा ठराव ग्रामपंचायतीत झाला आहे,” असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

बी. एस. होनगेकर यांनी बोलताना सांगितले की, “आठवीचा वर्ग बंद करून मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट होता. या ठिकाणी खाजगी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सरकारी शाळांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.” केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शाळाच नाही, तर पदवीपूर्व आणि पदवीपर्यंतचे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय देखील उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करत असल्याचे त्यांनी म्हटले.

उचगाव ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, आठवीचा वर्ग बंद करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीत कोणताही ठराव झालेला नाही. पाच जून रोजी जी ग्रामसभा झाली, त्यानुसार असा कोणताही ठराव झाला नसून, वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांवर चुकीची माहिती देण्यात आली आहे. याबद्दल आपण कोणतीही पुष्टी करत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.