बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेचे प्रभाग 23 चे नगरसेवक जयंत जाधव आणि प्रभाग 41 चे नगरसेवक मंगेश पवार यांचे पद अखेर रद्द करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नगरविकास खात्याने हा आदेश दिला आहे. प्रादेशिक आयुक्तांनी यापूर्वी बजावलेल्या आदेशाला पुढे करत नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळन यांनी हा आदेश बजावला आहे.
सुजित मुळगुंद यांनी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांकडे नगरसेवक जयंत जाधव (प्रभाग क्र. 23) आणि मंगेश पवार (प्रभाग क्र. 41) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली “खाऊ कट्टा” मधील दुकाने त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावर लिलावात घेतली होती अशी तक्रार दाखल केली होती.
यानुसार, जयंत जाधव यांनी दुकान क्रमांक 29 आपल्या पत्नीच्या नावावर, तर मंगेश पवार यांनी दुकान क्रमांक 28 आपल्या पत्नीच्या नावावर करून घेतले होते. ही कृती कर्नाटक महानगरपालिका अधिनियम 1976 च्या कलम 26(1)(के) चे स्पष्ट उल्लंघन असून, यामुळे दोघांनाही महानगरपालिकेच्या सदस्यत्वातून अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी मुळगुंद यांनी केली होती.
प्रादेशिक आयुक्तांनी यापूर्वीच या दोन्ही नगरसेवकांना अपात्र ठरवून त्यांचे पद रद्द करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला आव्हान देत जयंत जाधव आणि मंगेश पवार यांनी कर्नाटक महानगरपालिका अधिनियम 1976 च्या कलम 26(3) नुसार नगरविकास विभागाच्या सचिवांकडे अपील दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळन यांच्यासमोर झाली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूचे वकील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, बेळगाव आणि प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयातील शिरस्तेदार उपस्थित होते.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि सर्व पुरावे तपासल्यानंतर, नगरविकास खात्याने प्रादेशिक आयुक्तांनी यापूर्वी बजावलेल्या आदेशालाच पुढे करत जयंत जाधव आणि मंगेश पवार यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा अंतिम आदेश दिला आहे. मंगेश पवार हे महापौरपदी देखील विराजमान असल्याने आता त्यांचे नगरसवेक पदच रद्द झाल्याने महापौरपदावरूनही त्यांना पायउतार व्हावे लागणार आहे.


