बेळगाव लाईव्ह :यू मुंबाने अल्टीमेट टेबल टेनिस (यूटीटी) स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीवर आपले नाव कोरले.कर्नाटकची युवा स्टार यशस्विनी घोरपडे ही मूळ बेळगावची आहे आणि तिने सलग दुसऱ्या वर्षी यूटीटीमध्ये जेतेपद पटकावले आहे.
यशस्विनी गेल्या हंगामात चॅम्पियन डेम्पो गोवा चॅलेंजर्स संघाची सदस्य होती. ती सध्या महिला गटात भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर युवा भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, युवा दुहेरीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि सध्या जगात तिचे स्थान ८१ व्या क्रमांकावर आहे.
तिने ५० राष्ट्रीय पदके आणि ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत, ज्या मध्ये २०२२-२३ च्या कर्नाटक सरकारचा एकलव्य पुरस्कार समाविष्ट आहे.

यशस्वी यशस्विनीवर आशीर्वादांचा वर्षाव: टेबल टेनिसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्नाटकची युवा स्टार यशस्विनी घोरपडे हिच्या कुटुंबाने बेळगाव आणि गदग येथील तिच्या शाळेसह, क्रीडा प्रशिक्षक आणि तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही कामगिरी आकाशाला भिडणारी आहे.
रविवारी येथील एकेए अरेना येथे झालेल्या अंतिम सामन्यात मुंबाने जयपूर पॅट्रियट्सचा ८-४ असा पराभव करून आपले पहिले विजेतेपद पटकावले.
चॅम्पियन यू मुंबाने ६० लाख रुपये, उपविजेत्या जयपूरने ४० लाख रुपये आणि उपांत्य फेरीतील दबंग दिल्ली टीटीसी आणि गोवा चॅलेंजर्सने प्रत्येकी १७.५ लाख रुपये जिंकले. चालू हंगामात एकूण आठ संघांनी जेतेपदासाठी स्पर्धा केली.