बेळगाव लाईव्ह :भारतीय लष्कराच्या दक्षिण भारत क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांनी आज गुरुवारी सकाळी बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट देऊन तेथील कार्यात्मक तयारी आणि प्रशिक्षण मानकांची पाहणी केली.
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला दिलेल्या भेटीदरम्यान जीओसी लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार हे मराठा रेजिमेंटच्या कार्यात्मक तयारी आणि प्रशिक्षण मानकांची पाहणी करत असताना त्यांना प्रशिक्षण आणि प्रशासकीय पायाभूत सुविधांमधी भरीव प्रगतीबद्दल माहिती देण्यात आली.
विशेषतः अग्निवीर प्रशिक्षणासंदर्भात जीओसींनी प्रशिक्षण सत्रांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि उत्कृष्टतेसाठी केंद्राच्या अटल वचनबद्धतेचे कौतुक केले. तसेच भविष्यासाठी तयार होणारे सैनिक विकसित होत असलेल्या युद्धभूमीच्या गतिशीलतेशी जुळवून घेण्यास सक्षम आहेत याची खात्री करण्यासाठी पायाभूत टप्प्यांपासून प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महत्त्वावर जीओसी ब्रार यांनी भर दिला.

एमएलआयआरसीचे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासोबत जीओसी लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांनी सैन्य तळातील विविध स्टेशन युनिट्सना भेट देऊन एकूण कार्यात्मक समन्वय आणि तयारीचे मूल्यांकन केले. माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस) पॉलीक्लिनिकला भेट देताना जीओसी ब्रार यांनी माजी सैनिकांशी संवाद साधला. माजी सैनिकांच्या अमूल्य सेवेची प्रशंसा करताना त्यांच्या कल्याणासाठी सैन्याच्या सतत वचनबद्धतेची पुष्टी केली.
त्यानंतर त्यांनी एमएलआयआरसी बेळगावच्या आर्मी पब्लिक स्कूलला देखील सदिच्छा भेट दिली. तिथे त्यांनी विविध स्तरांवर क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्न करत राहण्यास प्रोत्साहित केले.
जीओसी लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांच्या भेटीचा एक भाग म्हणून त्यांच्या हस्ते बेळगाव लष्करी इस्पितळातील नव्याने स्थापन झालेल्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) विभागाचे उद्घाटन देखील करण्यात आले हा विभाग म्हणजे सेवारत कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.


