बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या बेळगावात स्वच्छतेची गंभीर समस्या उभी ठाकली आहे. शहरातील कीर्ती हॉटेलसमोरील आरटीओ कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळी घंटीगाडी दारोदारी कचरा गोळा करत असूनही, शिवाजी नगर आणि वीरभद्र नगरसारख्या आसपासच्या भागातून नागरिक दुचाकींवर येऊन बिनधास्तपणे कचरा टाकतात, ज्यामुळे ही जागा कचराकुंडीत बदलली आहे. या प्रकारामुळे बेळगाव महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि स्वच्छतेच्या बाबतीत असलेल्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता असल्याने, महापालिका स्वच्छतेकडे किती गांभीर्याने लक्ष देईल, हाच स्थानिक नागरिकांचा मुख्य प्रश्न आहे.
या गंभीर समस्येवर स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या मते, कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून कठोर दंड वसूल करणे आवश्यक आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, यामुळे स्थानिकांना आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. टाकलेला कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने ढिगारे वाढतच चालले आहेत. नागरिकांनी याकडे संबंधितांनी तातडीने लक्ष देऊन ही समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली आहे.
येथील स्थानिक व्यावसायिक अरुण चौगुले यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ला दिलेल्या प्रतिक्रियेत या समस्येची भीषणता अधोरेखित केली. चौगुले यांच्या म्हणण्यानुसार, कचऱ्यामुळे येथील व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर पसरलेल्या दुर्गंधीने ते हैराण झाले आहेत.
केवळ व्यापारीच नव्हे, तर स्थानिक रहिवासी आणि येथून ये-जा करणाऱ्या सर्व नागरिकांनाही या दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत आहे. चव्हाट गल्ली, शिवाजी नगर, उज्ज्वल नगर, निर्मल नगर यांसारख्या आसपासच्या अनेक भागांतील नागरिक रात्री-अपरात्री येऊन येथे कचरा टाकून जातात.

सकाळी कचरागाडी कचरा घेऊन जात असली तरी, दिवसभर नागरिक बेछूटपणे कचरा टाकणे सुरूच ठेवतात. अशा बेजबाबदार नागरिकांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज चौगुले यांनी व्यक्त केली. शिवाय, या कचरा ढिगाऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणात जनावरे येतात आणि कचऱ्यातील प्लास्टिकमुळे त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच, बेळगावमध्ये स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात ही समस्या आणखी बिकट होण्यापूर्वी, महापालिकेने यावर ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.