बेळगाव लाईव्ह :गेल्या कांही वर्षापासून आसपासच्या जंगलातील एखाद दुसरा वन्य प्राणी अधमधे नागरी वसाहतीत शिरतो हे बेळगावकरांसाठी नवीन नाही. आता काल सोमवारी रात्री एक मृत भेकर अनगोळ येथील लाल तलावाजवळ आढळून आले.
जंगलं कमी होऊ लागल्यामुळे वन्यप्राणी नागरी वसाहतीकडे वळू लागले असून बेळगावसाठी ते नवीन नाही. यापूर्वी बिबट्या, हत्ती, कोल्हा यांचा शहराच्या नागरी वसाहतीतील वावर शहरवासीयांनी अनुभवला आहे.
एक बिबटा तर जवळपास महिनाभर रेस कोर्स मैदान परिसरात मुक्काम ठोकून होता. आता काल सोमवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास कांही मुलांना अनगोळ येथील लाल तलावाजवळ एक भेकर अंधारात जमिनीवर निपचीत पडलेले आढळून आले.

जंगलातील त्या प्राण्याला चक्क आपल्या भागात पाहून आश्चर्यचकित झालेल्या त्या मुलांनी कुतूहलाने जवळ जाऊन शहानिशा केली असता ते भेकर मृत झाल्याचे निदर्शनास आले. सदरची माहिती त्यांनी अनगोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक सोमनाचे यांना दिली.
तेंव्हा दीपक यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृत भेकराला तपासले असता त्याच्या एका कानाचा भटक्या कुत्र्याने लचका तोडल्याचे आढळले. त्यानंतर दीपक यांनी त्वरित वन खाते आणि टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या भेकराबद्दल माहिती दिली. सदर माहिती मिळताच पोलिसांसह वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी रात्री लाल तलावाच्या ठिकाणी हजर झाले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी पाहणी करून ते मृत भेकर आपल्या ताब्यात घेतले.


