बेळगाव लाईव्ह :राष्ट्रीय महामार्ग (संकम जवळ) ते राणी चन्नम्मा सर्कलमार्गे तिसऱ्या रेल्वे गेटपर्यंतच्या बेळगाव शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे बांधकाम अखेर ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
जिल्हा पत्रकार संघाने माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रात मंत्री जारकीहोळी बोलत होते. उड्डाणपूलाची बांधणी दोन टप्प्यात केली जाईल आणि संपूर्ण काळात गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल याची खात्री जारकीहोळी यांनी दिली.
“सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकल्प उच्च दर्जा राखतील यावर आमचे लक्ष असेल. विशेषतः रस्ते, जे किमान 5 वर्षे टिकतील,” असे ते म्हणाले. उड्डाणपूल प्रकल्प ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असून तो राणी चन्नम्मा चौकमार्गे राष्ट्रीय महामार्गाला तिसऱ्या रेल्वे गेटशी जोडेल. उड्डाणपूल प्रकल्पासोबतच नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे काम देखील सुरू होणार आहे. रस्ते विकास प्रकल्पांसाठी निधीची कमतरता नाही, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
सर्वेक्षणाशी संबंधित अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे सांगून इतर विकास कामांची माहिती देताना बेळगाव ते धारवाड नव्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन पूर्ण झाले. बेळगावच्या रिंग रोडसाठी 80 टक्क्यापेक्षा जास्त जमीन अधिग्रहित करून भरपाई वाटप करण्यात आले आहे. रामतीर्थनगर येथे 10 कोटी रुपयांच्या निधीसह नवीन जिल्हा क्रीडांगण बांधले जात आहे. या प्रकल्पांसाठी पुढील अर्थसंकल्पात अधिक निधी वाटप केला जाईल. सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुरू आहेत, असे त्यांनी नमूद केले.

आरोग्यसेवे बाबत बोलायचे झाल्यास सौंदत्ती आणि अथणी येथे 100 खाटांची रुग्णालये नियोजित असून त्यासाठी निधी लवकरच मंजूर केला जाईल. जिल्ह्यात अंगणवाड्यासाठी 257 नवीन इमारती मंजूर झाले आहेत, असे मंत्री जारकीहोळी यांनी पुढे सांगितले.
गोवा -बेळगाव महामार्गावरील वाहतूक कोंडीचे कारण सदर रस्त्याच्या विकासावर 50 कोटी रुपये खर्च करूनही वन विभागाकडून मंजुरी न मिळाल्याने गोवा-बेळगाव रस्त्याचे रखडले प्रस्तावित रुंदीकरण हे आहे असे सांगून लोकसंख्येच्या आधारे पोलिस ठाण्यांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.