बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने लागू केलेल्या ‘शक्ती’ योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठे बळ मिळाले आहे. ही योजना लागू झाल्यापासून वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळ आता नफ्यात आले आहे, अशी माहिती बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बसस्थानकांचे आधुनिकीकरण करून जनहितार्थ बसची संख्या वाढवण्यात येणार असून, २८१४ नवीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीवरही लवकरच विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
बेळगावात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाची विभागस्तरीय तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंडळाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले, “वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळ आता नफ्यात आहे. सरकार डिसेंबरपर्यंत नवीन बस खरेदी करण्याचा विचार करत आहे.
जुन्या बसस्थानकांना मूलभूत सुविधा पुरवून त्यांचे आधुनिकीकरण केले जाईल, तसेच काही समस्या बेंगळुरू पातळीवर चर्चा करून सोडवल्या जातील.” कोविड काळात काही ठिकाणी थांबलेली सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी बस थांबवण्यावरही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “यावेळी कोणतीही जुनी बस आलेली नाही, सर्व नवीन बसेसच दिल्या आहेत. तोट्यात असलेली परिवहन संस्था ‘शक्ती’ योजनेनंतर नफ्यात आली आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय, सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेशही देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाचे अध्यक्ष, आमदार राजू कागे यांनी माहिती दिली की, बसस्थानके आणि जुन्या कार्यशाळांच्या विकासासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर बस थांबे, वेगदूध बसला थांबे, कर्मचाऱ्यांच्या मागण्या, तक्रारी आणि वेतन सुधारणेबाबत सविस्तर चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन विभागाला टप्प्याटप्प्याने गरजेनुसार ३०० नवीन बसेस दिल्या जातील, अशी माहितीही कागे यांनी दिली. तसेच, २८१४ कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून, सरकारने कायदेशीर अडथळे दूर करून नेमणुका करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही ते म्हणाले.
या बैठकीला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, सवदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


