बेळगाव लाईव्ह : एका माथेफिरू कार चालकाने रस्त्यावर सुसाट वेगाने स्वैर-बेभान कार गाडी चालवून घबराट उडवून देण्याबरोबरच कार रस्त्यावर सोडून पलायन केल्याची घटना बेळगाव शहराच्या मध्यवर्ती विभागात आज बुधवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कार चालकाने टिळक चौकाकडून रामलिंग खिंड गल्ली मार्गे शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकाकडे सुसाट वेगाने आपली कार दामटताना काही वाहनांना देखील ठोकरले.

त्यानंतर जत्ती मठासमोर भानावर आलेल्या त्या कारचालकाने आपली कार तिथेच सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. मात्र तोपर्यंत सदर मार्गावर खळबळ उडवून पादचाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
याबाबतची माहिती मिळताच रहदारी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन कार ताब्यात घेतली. त्याचप्रमाणे कारमालकाचा शोध हाती घेतला आहे.




