बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि आसपासच्या गावांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे या रस्त्यांवर सर्वत्र मोठे खड्डे पडले असून, ते वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली असून, नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव तालुक्यातील हलगा ते अलारवाड पूल, गांधी नगर, अशोक नगर, श्रीनगर, यमनापूर मार्गे काकतीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी हे खड्डे इतके मोठे झाले आहेत की, त्यात पाणी साचून रस्ते आहेत की तलाव, असा प्रश्न पडत आहे.
. विशेषतः गांधी नगर भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग दिसेनासा झाला आहे. परिणामी या समस्येमुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षाबद्दल वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सुवर्ण विधान सौध आणि काकतीकडून बेळगाव शहरात प्रवेश करण्यासाठी हजारो वाहने दररोज याच सर्व्हिस रोडचा वापर करतात. हे मार्ग नेहमीच वर्दळीचे असतात. मात्र, खराब झालेल्या रस्त्यांमुळे वेगाने महामार्गावरून येणारी वाहने सर्विस रोडवर उतरताच चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अनेकदा खड्ड्यांमध्ये आदळून वाहने अनियंत्रित होतात, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. शिवाय या धोकादायक स्थितीमुळे वाहतूक कोंडी देखील नित्याची झाली आहे.
पूर्वी सुरक्षिततेसाठी आम्ही महामार्गाऐवजी सर्व्हिस रोडचा वापर करत होतो, पण आता इथले खड्डे इतके मोठे आहेत की, गाडीचे नियंत्रण सुटून अनेकजण पडले आहेत. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी आता नाईलाजाने मुख्य महामार्गावरूनच प्रवास करावा लागतोय अशा प्रतिक्रिया अनेक वाहनधारक व्यक्त करत आहेत. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्यांची दुरुस्ती करायला हवी होती, एनएचएआयने केवळ महामार्गाची नव्हे, तर सर्व्हिस रोडचीही देखभाल करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
हलगाच्या ग्रामविकास अधिकारी विजयलक्ष्मी तेग्वी यांनी एनएचएआय अधिकाऱ्यांकडे सर्व्हिस रोड दुरुस्त करण्याची विनंती केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. यावर एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी पावसाने खराब झालेले काही रस्ते दुरुस्त केल्याचे सांगितले, परंतु पाऊस कमी झाल्यावरच उर्वरित कामे हाती घेतली जातील असे स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या गंभीर समस्येची दखल घेतली असून, “लवकरच एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व्हिस रोड तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देईन, असे आश्वासन दिले आहे.
बेळगावातील फळ मार्केट, फुल मार्केट आणि खासगी होलसेल भाजी मार्केट हे सर्व सर्व्हिस रोडजवळच आहेत. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने या रस्त्यांचा वापर करतात. खराब झालेल्या रस्त्यांमुळे त्यांना आपले शेती उत्पादन मार्केटपर्यंत पोहोचवण्यात आणि मालाची ने-आण करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. याव्यतिरिक्त, महामार्गालगतच्या शेतीत जाण्यासाठीही दररोज या धोकादायक रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागतो. यामुळे ऐन शेतीकामाच्या हंगामात शेतकऱ्यांनाही या रस्त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एनएचएआयने या गंभीर नागरी समस्येकडे त्वरित लक्ष देऊन सर्व्हिस रोड्सची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.


