बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्याला गेल्या चार दिवसांपासून झोडपणाऱ्या मुसळधार पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. तथापि दिवसभर रिपरिप सुरू राहिल्यामुळे तालुक्यातील तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी, नाल्यांची पातळी स्थिर आहे. हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थानातील मलप्रभेचे पाणी अद्याप ओसरलेले नाही. यावेळी खानापूर तालुक्यात जूनमधील सरासरी पेक्षा दुप्पट पाऊस नोंदवला गेला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडलेल्या जोरदार पावसामुळे विशेष करून गेल्या मंगळवार व बुधवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तालुकावासियांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून विशेष करून भात पिकावर या पावसाचा परिणाम झाला आहे.
भाताची पेरणी झालेली बियाणे कुजण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. दुबार पेरणीसाठी सूर्यप्रकाशयुक्त उघडीपीची गरज आहे, जर ती मिळाली नाही तर जमीन नापेर राहण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरीबांधव चिंतातूर झाले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या भाताची उगवण झाली असली तरी सध्याच्या पावसात कोवळ्या भाताचे पीक पाण्याखाली गेल्याने कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या पाण्याचा प्रवाहामुळे शेतात मोठ्या प्रमाणात जमीन खचण्याचे प्रकार सुरू आहेत. सतत पाऊस असल्याने पेरणी कालावधीही संपला आहे.

दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांची संपूर्ण वाताहत झाल्यामुळे गावकऱ्यांना मोठी कसरत करत खानापूर गाठावे लागत आहे. कणकुंबी, जांबोटी परिसरात देखील पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर सळखेवर पाऊस होत असल्याने पश्चिम भागातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे गोव्याच्या वाहतुकीचा रस्ता बंद झाला आहे. कणकुंबी पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थान अद्यापही मलप्रभा नदीच्या पाण्यातच आहे.
दरम्यान, खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात आणि पूर्व भागात सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात गेल्या 1 जूनपासून काल 26 जूनपर्यंत सर्वसामान्य सरासरीपेक्षा दुप्पट म्हणजे 269 मि.मी. च्या तुलनेत 588 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावेळी खानापूर गावात 357 मि.मी., बिडी येथे 295 मि.मी , गुंजी येथे 640 मि.मी., तर पश्चिम भागातील जांबोटी, कणकुंबी येथे सर्वाधिक 802 मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे आहे.
जून महिना संपायला अद्याप तीन दिवस शिल्लक असल्यामुळे या कालावधीत पावसाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या जुलै ऑगस्ट महिन्यात पाऊस कायम राहिल्यास यावर्षी खानापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य सरासरीपेक्षा विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.


