बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील पश्चिम घाट प्रदेशात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा आणि हिरण्यकेशी नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
कृष्णा नदीत ५४ हजार क्युसेक पाण्याची आवक नोंदवली गेली आहे. चिकोडी उपविभागांतर्गत १२ गावांना जोडणारे सहा सखल पूल पाण्याखाली गेले आहेत.
दूधगंगा नदीवरील मलिकवाड – दत्तवाड गावांना जोडणारा पूल, वेदगंगा नदीवरील बारवाड – कुन्नूर, भोज – कारदगा, भोजवाडी – कुन्नूर येथील पूल, तसेच कृष्णा नदीवरील येडूर – कल्लौळ आणि भावनसौदात्ती – मांजरगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत.
नागरिक पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. बेळगाव जिल्हा प्रशासनाने नदीकाठी हाय अलर्ट जारी केला असून, लोकांना नदीच्या दिशेने न जाण्याचे निर्देश देत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.