बेळगाव लाईव्ह : कित्येक दिवसांच्या उघडीपीनंतर बेळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामातील रखडलेल्या कामांना आता पुन्हा वेग आला असून मान्सूनच्या आगमनामुळे पेरणी आणि इतर शेतीसंबंधित कामे जोमात सुरू झाली आहेत.
यंदाच्या उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला, म्हणजेच मे महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकरी संभ्रमात पडले होते. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीची कामे, नांगरणी आणि इतर तयारीची कामे सुरू केली. एकीकडे मजुरांची कमतरता आणि दुसरीकडे वातावरणातील अनियमितता यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच, उघडिपीनंतर बुधवारी पुन्हा पावसाने ‘कमबॅक’ केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतजमिनीत मशागतीसाठी गेलेले ट्रॅक्टर आता पेरणीची कामे सुरू झाल्याने घरी परतू लागले आहेत.
बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भातपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यासाठी पेरणी आणि काही ठिकाणी लावणीची तयारी जोमात सुरू झाली आहे. काही ठिकाणी, मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनच्या पावसामुळे पेरण्या थोड्या रखडल्या होत्या, परंतु आता त्या पूर्वपदावर येत आहेत. विशेष म्हणजे, भात पेरणीची पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा होत असून, रोप लावणीचा प्रकार आता अधिक सामान्य झाला आहे. भातपिकासह बेळगाव जिल्ह्यात ऊस, भुईमूग शेंगा, सोयाबीन, बटाटा, रताळी यांसारख्या अनेक पिकांची लागवड करून उत्पादन घेतले जाते.
एकंदरीत, मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे रखडलेली सर्व कामे आता पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. पावसाने पुन्हा सुरूवात केल्यामुळे शेतकरी आता उत्साहाने खरीप हंगामातील कामकाजात व्यस्त झाले आहेत. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळून चांगले उत्पादन येण्याची आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.