बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेतील विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नव्या विरोधी गटनेते पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली असून नगरसेवक रवी साळुंके, सोहेल संगोळी व रियाज किल्लेदार यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.
गेली दोन वर्षे मुजम्मिल डोणी हे विरोधी घटनेचे म्हणून कार्यरत होते. खरे तर दरवर्षी सत्ताधारी आणि विरोधी गटनेत्यांची निवड केली जाते. मात्र विविध कारणास्तव नगरसेवक मुजम्मिल डोणी यांना दोन वर्षाहून अधिक काळ विरोधी गट नेते म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.
मात्र अलीकडे विरोधी गटातीलच कांही नगरसेवकांकडून डोणी यांच्या विरोधात मोठी आघाडी उघडण्यात आली होती. महापालिकेच्या गेल्या सर्वसाधारण बैठकीच्या आधी सत्ताधारी गटनेतेपदी गिरीश धोंगडी यांच्या ऐवजी हनुमंत कोंगाळी यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली.
त्यामुळे विरोधी गटनेता बदलण्याची मागणी सुरू झाली होती. त्या अनुषंगाने मुजम्मिल डोणी यांनी गेल्या रविवारी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) शेठ यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
डोणी यांच्या राजीनाम्यामुळे आता विरोधी गटनेत्याच्या निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विरोधी गटनेते पदासाठी या गटातील नगरसेवकांचे लेखी समर्थन मिळवण्याची मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम राबविणाऱ्यांमध्ये नगरसेवक रवी साळुंके सोहेल संगोळी, रियाज किल्लेदार व लक्ष्मी उपरी यांचा समावेश आहे.
तथापि सध्या गटनेतेपदासाठी किल्लेदार, साळुंके आणि संगोळी यांच्या तिघांची नावे चर्चेत आहेत. गेल्या 2023 मध्ये लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात येण्याआधी विरोधी गटनेतेपदासाठी मोर्चे बांधणी करणाऱ्या नगरसेवकांमध्ये रवी साळुंके यांचाही समावेश होता.
तथापि आमदार सेठ यांनी त्यावेळी साळुंखे यांची मनधरणी केली होती. आमदार असिफ सेठ यांनीच डोणी यांच्याकडे विरोधी गटाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडून साळुंके यांना संधी दिली जाणार का? याबाबत उत्सुकता आहे.


