बेळगाव लाईव्ह :आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला 18 वर्षानंतर विजेतेपद मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी काल बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियम आयोजित समारंभाप्रसंगी चेंगराचेंगरी होऊन घडलेल्या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना अतिशय दुःखद असून योग्य नियोजना अभावी ती घडली असल्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकारने या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपली चूक मान्य करून समस्त जनतेची जाहीर माफी मागावी, असे परखड मत श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले.
बेळगावमध्ये आज गुरुवारी सकाळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले की, बेंगळूर येथे काल घडलेली दुर्घटना अतिशय दुःखदायक आहे. विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी गेलेल्या 11 जणांचा बळी गेला हे खरोखर दुर्दैवी आणि दुःखद असून श्रीराम सेनेच्या वतीने मी संबंधित मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो.
ही जी दुर्घटना घडली त्याला राज्यातील काँग्रेस सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. आपली चूक राज्य सरकारने मान्य केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणाऱ्या विजयोत्सवाचा लाभ उठवण्याच्या घाईमध्ये चांगले नियोजन न करता तो उरकण्याचा प्रयत्न केला गेला. विजयोत्सवासाठी येणाऱ्या समर्थकांच्या मोठ्या संख्येचा विचार करून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने समारंभाचे नियोजन करावयास हवे होते. मात्र याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त विजयोत्सवाची घोषणा करण्यात आली. हे चुकीचे असल्यामुळे काँग्रेस सरकारने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी. जनतेसमोर आपली चूक मान्य करून त्यांनी क्षमा मागावी.


दुसरी गोष्ट म्हणजे कालच्या दुर्घटनेची देशात अन्यत्र यापूर्वी घडलेल्या कुंभमेळा दुर्घटना वगैरे सारख्या दुर्घटनांशी तुलना करणे बंद करावे. मुख्यमंत्र्यांनी अशी तुलना करणे त्यांना शोभत नाही. याचा अर्थ कुंभमेळ्याच्या दुर्घटनेत अनेक जण मरण पावले तसे कालच्या दुर्घटनेत 11 जण मृत्युमुखी पडले तर काय बिघडलं? असा समजायचा का? विरोधी पक्ष कालच्या दुर्घटनेसंदर्भात राज्य सरकारवर टीका करत आहे.
ती टीका खरं तर काँग्रेस सरकारने खिलाडूवृत्तीने स्वीकारली पाहिजे आणि पुढे अशी चूक होणार नाही असे सांगून जनतेची क्षमा मागितली पाहिजे. त्याऐवजी घडलेल्या 11 जणांचा बळी घेणाऱ्या दुर्घटनेवरून राजकारण करणे मूर्ख आणि नीचपणाचे लक्षण आहे, असे प्रमोद मुतालिक यांनी शेवटी नमूद केले.