ऑल इज वेल प्रेक्षकांना नक्की आवडेल : सयाजी शिंदे

0
11
 belgaum

बेळगाव लाईव्ह :’ऑल इज वेल’ हा सर्वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे. बेळगाव एखादा मराठी चित्रपट हिट झाला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात हिट होतो. तेंव्हा बेळगाव मध्ये त्या 27 जून रोजी प्रदर्शित होणारा ‘ऑल इज वेल’ चित्रपट प्रेक्षकांनी आपले कुटुंब मित्रमंडळींसह मोठ्या संख्येने चित्रपटगृहात जाऊन पहावा, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

बेळगावातील ‘ऑल इज वेल’ या विनोदी मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आज मंगळवारी सकाळी शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. अभिनेते शिंदे म्हणाले की, ‘ऑल इज वेल’ चित्रपट करताना खूप मजा आली असली तरी तो प्रथम बेळगावमध्ये प्रदर्शित होतोय याचा जास्त आनंद होत आहे. कारण बेळगावमध्ये एखादा चित्रपट हिट झाला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात हिट होतो. जगातील सर्व प्रेक्षक हा चित्रपट पाहतील अशी अपेक्षा आहे.

मनोरंजनात्मक चित्रपट सर्वांनाच आवडतात आणि अशा चित्रपटांचे लेखन करण्याचे नेमके मर्म प्रियदर्शन जाधव याला कळाले आहे. योगेश जाधव आणि त्याचा समन्वय उत्तम असून ऑल इज वेल चित्रपटात या दोघांच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आहे. हा चित्रपट गोड आहे सर्वांनी तो चित्रपटगृहात जाऊन पहावा. खरंतर अलीकडच्या काळात सर्व माध्यमातून मनोरंजनाचा भडीमार होत आहे हे खरे आहे. पूर्वी दादा कोंडके यांचा एक चित्रपट यायचा जो त्या काळात एकमेव मनोरंजनात्मक चित्रपट असायचा आणि त्यामुळे त्याची प्रेक्षक संख्या मोठी असायची. मात्र आता अनेक मनोरंजनात्मक चित्रपट, टीव्ही सिरीयल येत असल्यामुळे हा प्रेक्षक विभागला गेला असला तरी आमच्या चित्रपटाला निश्चितच गर्दी होईल असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

 belgaum

‘ऑल इज वेल’ हा चित्रपट सर्वांना खूप आवडला असून बऱ्याच जणांनी तो पुन्हा पुन्हा पाहिला आहे. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी येणाऱ्यांनी आपल्या सोबत आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना घेऊन यावे असे आवाहन करून चित्रपट हिट केल्याबद्दल अभिनेत्री सयाजी शिंदे यांनी समस्त प्रेक्षकांचे आभार मानून धन्यवाद दिले.

आईकडून शिकलेली भाषाच खरी भाषा : महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीबद्दल बोलताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, भाषेची सक्ती करून ती शिकवता येत नाही. मुळात आपण आपल्या आईकडून जी भाषा शिकतो तीच खरी भाषा असते आणि तीच शेवटपर्यंत टिकते. भाषेची सक्ती करणारी सरकारे येतील अन् जातील, परंतु भाषा कायम टिकून राहते. हजारो वर्षापासून टिकून राहिलेली असल्यामुळे आपली मराठी भाषा या सरकारने सक्ती केली म्हणून बदलणार नाही. आपण आईकडून जी भाषा शिकतो तीच खरी भाषा असते. आई-वडिलांपेक्षा जगात कोणतेही मोठे विद्यापीठ नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये सरकारने भाषेची सक्ती करणे याला मी फारसे महत्त्व देत नाही.

आपली मराठी भाषा ही आपल्या आईची भाषा आहे. मला इतर भाषांचाही आदर आहे, परंतु सर्वात जास्त आदर मराठी भाषेबद्दल आहे. राजकारणात जो इतरांना डावलतो त्याला एक दिवस डावललं जात, डावावर डाव होत असतात. राजकारणात सतत बदल होत असतात त्यामुळे त्याबद्दल न बोललेलं बरं असे सांगून मराठी माणसाने आपल्या मातृभाषेवरील प्रेम दाखवून दिले पाहिजे. त्यासाठी त्यांनी कमीत कमी आपल्या मुलांना मराठी भाषेत शिक्षण दिले तरी खूप आहे, असे मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेस ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांसह अभिनेते प्रियदर्शन जाधव आणि चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.