बेळगाव लाईव्ह : कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट होत असून स्वतःच्याच पक्षाच्या सरकारवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत, कागवाड मतदारसंघाचे ज्येष्ठ काँग्रेस आमदार राजू कागे यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी आपल्या मतदारसंघातील विकासासाठी २५ कोटी मंजूर होऊनही, अद्याप एकही ‘वर्क ऑर्डर’ मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करत काँग्रेस राजवटीत प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचा गंभीर आरोप करत, कागे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.
सोमवारी ऐनापूर येथे विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना, राजू कागे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. “राज्य सरकारची प्रशासकीय व्यवस्था अजिबात चांगली नाही,” असे ते म्हणाले. काँग्रेस आमदार बी.आर. पाटील यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या मतालाही त्यांनी पाठिंबा दिला. प्रशासकीय व्यवस्थेला कंटाळून आपण येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे कागे यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा पंचायतीचे वरिष्ठ अधिकारी मतदारसंघातील कामांवर लक्ष ठेवण्यासाठी वेळ देत नाहीत. दोन वर्षांपूर्वी कंत्राटदारांनी घेतलेली कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत असा आरोपही त्यांनी केला असून उगार-शिरगुप्पी रस्त्याचे उदाहरण देत कंत्राटदारांना फटकारले. तसेच ”मी या व्यवस्थेला पूर्णपणे कंटाळलो आहे आणि माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर मी ठाम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राजू कागे यांच्या या भूमिकेने भाजपला काँग्रेसवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. भाजप नेत्यांच्या मते, कागे यांच्यासारखे अनेक काँग्रेस आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आमदार स्वतःच आपल्या सरकारवर आरोप करत असल्याने, राज्यात काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला तोंड फुटले असून सरकारला घरघर लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. कागे यांचा राजीनामा काँग्रेस सरकारसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे, ज्यामुळे सरकारची स्थिरता आणि कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


