बेळगाव लाईव्ह विशेष : म्हादाई या गोव्यातील नदीला जोडणारे उत्तर कर्नाटकातील दोन कालवे तोडून याच उत्तर कर्नाटकातील धारवाड, नरगुंद आणि नवलगुंद या भागाला पाणी देणार या कर्नाटकाच्या प्रकल्पाला गोव्याचा विरोध आहे. म्हादाई नदीला होणारा कळसा आणि भांडुरा या दोन नाल्यांचा पाणीपुरवठा थांबला तर गोव्याचे नुकसान होणार आहे, कारण ही नदी गोव्याच्या मासेमारी पासून अनेक व्यवसायांना अनेक वर्षे पोसत आली आहे.
कर्नाटक म्हणते प्यायला पाणी नाही अशा भागात आमच्या हक्काचे पाणी आम्ही देतोय, गोवा आणि कर्नाटकाचा वाद सुरू आहे, यात कर्नाटकाच्या जोखडात अडकलेल्या सीमाभागात गोव्याच्या बाजूने आंदोलने सुरू आहेत, असा दावा खुद्द मूळचे धारवाड जिल्ह्यातील असलेल्या आणि अपघाताने बेळगावचे भाजपचे खासदार बनलेल्या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केला आहे. यातूनच आंदोलन स्पॉन्सर्ड ही परिभाषा पुढे आली असून आंदोलन करणारे गोव्याचे एजंट आणि विरोध करणारे कर्नाटकचे एजंट असा नवा वाद निर्माण झाला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे दिवस आठवा, भाजपचे प्रमुख नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची ती सभा आठवा ज्यात अमित शहा म्हणाले होते की आम्ही कळसा आणि भांडुरा प्रकल्पाचे पाणी कर्नाटकला देण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत. तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही याला दुजोरा दिला होता. यामुळे गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या प्रमोद सावंत यांची गोची झाली होती आणि त्यांना गोव्यात प्रचंड विरोध झाला होता.
कर्नाटकातील जनतेने मात्र या भूल थापा ओळखल्या आणि काँग्रेसला कौल दिला. आज गोव्यात त्याच भाजपच्या प्रमोद सावंत यांचे सरकार आहे. केंद्रीय गृहमंत्री पदावर तेच भाजप नेते अमित शहा आहेत, कर्नाटकात दुर्दैवाने काँग्रेस आल्याने सध्या हा प्रकल्प अडचणीत आलाय. आणि त्यात कर्नाटकाच्या सीमाभागात गोव्याच्या बाजूने आंदोलने सुरू झाली आहेत. म्हणजेच ही आंदोलने काँग्रेस विरोधात आणि भाजप पुरस्कृत असे म्हणण्याला वाव आहे.

आता प्रश्न आहे हे विधान काँग्रेस नेत्यांपेक्षा बेळगावचे खासदार आणि काँग्रेस रिटर्न जगदीश शेट्टर यांनी केले ते कसे काय याचा? शेट्टर हे धारवाडचे. ते बेळगावचा मुखवटा घालून धारवाडचे काम करीत असल्याचा आरोप राजीव टोपण्णावर यांनी केला आहेच. मात्र शेट्टर आपल्या जिल्ह्यातील तहानलेल्या व्यक्तींसाठी प्रसंगी आपल्या पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेऊ शकतात हे सिद्ध झाले आहे.
राहिला मुद्दा सीमाभागात आंदोलन करणाऱ्या नेतृत्वाचा. सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे असे सांगत राष्ट्रीय पक्षाशी संधान ही त्यांची भूमिका लपलेली नाही. आंदोलन घडवताना भाजपची तळी उचलण्यासाठी स्वार्थ साधला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मुळात म्हादाईचा पाणी वाटपाचा मुद्दा आणि हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी दरवाढीच्या औद्योगिक वसाहतीला देण्याचा मुद्दा हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत मात्र सध्या होत असलेल्या आंदोलनात हे विषय एकत्रित केले जात असल्याचीही चर्चा आहे. हिडकल जलाशय पाणी वाटप हा कर्नाटकाचा अंतर्गत प्रश्न आहे तर म्हदाई प्रश्न तीन राज्यातील सीमेवरील पाण्याचा वाद आहे.
आता पर्यावरणाचे नुकसान अर्थात भीमगडी अभयारण्य आणि सीमाभागातला पाऊस यासाठी ही आंदोलने सुरू आहेत की बेळगाव जांबोटी चोरला मार्गावरील काही चोरटा स्वार्थ कारणीभूत आहे, हे यापुढील निवडणुकीच्या तोंडावर घेतल्या जाणाऱ्या भाजप आणि धोंडांच्या भूमिकेवर स्पष्ट होणार आहे.