बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरोधात बेळगावमध्ये सन 2017 व 2021 ला भरवलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्या संदर्भातील खटल्यांची सुनावणी आज शनिवारी बेळगावच्या जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात पार पडली. यावेळी समितीचे नेते अध्यक्ष दीपक दळवी यांच्या विरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वारंट संदर्भातील जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
बेळगावात भरवल्या जाणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशना विरुद्ध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करते. सन 2017 व 2021 ला महामेळावा आयोजित केला म्हणून कर्नाटक पोलिसांनी समिती नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत.
या दोन्ही खटल्यांची सुनावणी आज शनिवारी 28 जून रोजी बेळगावच्या जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात पार पडली. मध्यवर्ती महाराष्ट्र समितीचे नेते अध्यक्ष दीपक दळवी हे तब्येतीच्या कारणाने बरेच दिवस झाले न्यायालयात हजर राहू शकले नसल्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वारंट जारी केले होते.
त्यांचा जामीन अर्ज वकील ॲड. महेश बिर्जे यांनी दाखल करून न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेतला. तसेच दीपक दळवी न्यायालयात हजर राहू शकत नसल्यामुळे आज दीपक दळवी यांच्यावतीने ॲड. महेश बिर्जे यांनी विनंती अर्ज दाखल केला की, दीपक दळवी यांना तब्बेतीच्या कारणास्तव न्यायायलायत प्रत्यक्ष हजर राहता येत नसल्याने त्यांची कोर्टातील हजेरी ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्राह्य धरली जावी. यासंदर्भात न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून येत्या 17 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत यावर निर्णय होणार आहे.
दिपक दळवी व समिती कार्यकर्त्यांच्यावतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. एस.बी. बोंद्रे, ॲड. रिचमन रिकी व ॲड. वैभव कुट्रे हे काम पाहत आहेत. या दोन्ही खटल्यामध्ये दीपक दळवी यांच्यासह मालोजीराव अष्टेकर, मनोहर किनेकर, प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, प्रकाश शिरोळकर, शिवाजी सुंठकर, रणजित चव्हाण-पाटील, शुभम शेळके, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, मनोहर हलगेकर, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, दिलीप बैलूरकर, पीयूष हावळ, सुनील बोकडे, बाबू कोले, आर. एम. चौगुले, अनिल आमरोळे, मदन बामणे, संतोष मंडलिक, दत्ता उघाडे, राकेश पलंगे, सुरज कणबरकर, श्रीकांत कदम, सुरज कुडूचकर, सचिन केळवेकर, बापू भडांगे आदींचा समावेश आहे.