बेळगाव लाईव्ह :मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका शिष्टमंडळाने आज सकाळी कोल्हापूर मुक्कामी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमाप्रश्न व सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या याबाबत चर्चा केली.
सदर भेटीप्रसंगी शरद पवार यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकांमध्ये सभासदानी व्यक्त केलेल्या भावनांची त्यांना माहिती करून देण्यात आली. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीच्या सभासदांची लवकरात लवकर बैठक घेऊन सीमा प्रश्नसंदर्भात महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी याबाबत प्रयत्न करण्याची विनंती केली.
त्याचप्रमाणे सीमाप्रश्नाच्या संदर्भात सरकारच्यावतीने नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीचीही पुनर्रचना करावी. तसेच या समितीचे अध्यक्ष म्हणून मध्यवर्तीच्या ठरावाप्रमाणे जयंतराव पाटील यांची नेमणूक करण्याबाबत प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली.
शिष्टमंडळाबरोबर करताना शरद पवार यांनी उद्या आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करतो अशा प्रकारचे आश्वासन दिले. कोल्हापूर येथे मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे. तालुका म. ए. समिती चिटणीस एम. जी. पाटील व सुनील आनंदाचे यांचा समावेश होता.
कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्याचे व मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले.





