बेळगाव लाईव्ह : शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मटका खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १२,६२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सीसीबी आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी केली.
तुम्मरगुद्दी येथील वाल्मिकी गल्ली येथे सीसीबी विभागाचे पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून काशी बसप्पा कालेरी (रा. तुम्मरगुद्दी) याला सार्वजनिक ठिकाणी जुगारप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून २,७०० रुपये रोख, एक मोबाईल यासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. याचप्रमाणे हुदली येथील साखर कारखान्याजवळ सार्वजनिक ठिकाणी मटका घेणाऱ्या शांतप्पा भीमप्पा बागराय (रा. नाईक गल्ली, हुदली)याला मांजरीहळ पोलीस ठाण्याचे पीएसआय चंद्रशेखर. सी. आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून अटक केली असून त्याच्याकडून १,२२० रुपये रोख यासह इतर साहित्य जप्त केले आहे.
तसेच कंग्राळ गल्ली येथील चंद्रशेखर पडदया करजगीमठ त्यालादेखील जुगारप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्याचे पीएसआय श्रीशैल हुलगेरी आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून अटक करत त्याच्याकडून २,७०० रुपये रोख आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
वरील तीन प्रकरणांमध्ये एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ६,६२० रुपये रोख, एक मोबाईल आणि इतर मुद्देमाल यासह १२,६२० रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल संबंधित पोलीस ठाण्याचे पीआय, पीएसआय आणि कर्मचारी पथकाचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.