बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर येथे सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार नाचवून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला माळमारुती पोलिसांनी नुकतीच अटक करून त्याच्याकडील तलवार जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव मल्लिकरीहान रफिक पन्नाळकर (वय 25, रा. उस्मान गल्ली, दुसरा क्रॉस, न्यू गांधीनगर बेळगाव) असे आहे. मल्लिकरीहान याच्या विरोधात गेल्या 2024 मध्ये माळमारुती पोलीस ठाण्यात रावडी शीट उघडण्यात आली आहे. असे असतानाही तो गेल्या बुधवार दि. 11 जून रोजी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास न्यू गांधीनगर येथील रेल्वे रुळाजवळ वर्दळीच्या ठिकाणी तलवार नाचवत दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तेंव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी तलवार नाचणाऱ्या मल्लिकरीहान पन्नाळकर याला रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील धारदार लोखंडी तलवार जप्त केली.
तसेच त्याच्या विरोधात कलम 97 कर्नाटक पोलीस कायदा -1963 आणि कलम 27(1) भारतीय शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, उपायुक्त निरंजनराजे अरस आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली.