बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या अभियंत्याला
भारत-ब्राझील साखर व बायो-एनर्जी मिशनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे त्यामुळे बेळगावच्या सहकार क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारत आणि ब्राझील दरम्यान जैवइंधन मोहीम 2025 या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळामध्ये बेळगावच्या लिओ इंजिनियर्स चे जयदीप बिरजे यांचा सहभाग आहे.
हे मिशन एन एफ सी एस एफ (राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघ लि.)आणि भारत ब्राझील चेंबर ऑफ काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. भारत देशातून सहभागी होणाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व एन. एफ. सी.एस. एफ. यांच्या मान्यवरांकडे यात देशभरातील सहकारी व खासगी साखर उद्योगांचे अध्यक्ष, संचालक व उद्योजक यांचा देखील या शिष्टमंडळात सहभाग आहे.लिओ इंजिनिअर्सचे प्रतिनिधित्व करताना जयदीप बिर्जे यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे शिष्टमंडळात सहभाग घेतला आहे.

जयदीप यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले की हे मिशन साखर, जैवइंधन (Bioenergy), आणि शाश्वत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याचे आणि भविष्यातील संधी शोधण्याचे उद्दिष्ट ठेवून आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये साओ पाउलो आणि रिओ दि जानेरो येथे ब्राझीलच्या उद्योग प्रतिनिधींशी चर्चा, तांत्रिक देवाणघेवाण आणि दीर्घकालीन भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारतीय अभियांत्रिकी आणि सहकारी क्षेत्रासाठी हे एक अत्यंत अभिमानास्पद पाऊल आहे, जे शाश्वत आणि हरित भविष्याकडे भारताची वाटचाल अधोरेखित करते असेही त्यांनी नमूद केले.




