बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील बेळगाव चोर्ला रोड वरील कुसमळी पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. रविवारी तात्पुरता बनवलेल्या रस्त्याच्या पुलावरचे माती खचल्याने पुन्हा हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन जुना पुल काढून नवीन फुल बनवण्यात येत आहे.त्यासाठी मलप्रभा नदीतून पर्यायी रस्ता बनवण्यात आले आहे.परंतु रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पर्यायी रस्ता पुन्हा एकदा खचल्याने बेळगाव चोर्ला गोवा अशी वाहतूक सायंकाळपासून पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.
गेल्या पाच सहा महिन्यांपासून मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन जुना पुल काढून त्या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात येत आहे.त्यामुळे मलप्रभा नदीतून मातीचा भराव टाकून पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे.परंतु मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या वळीव पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली होती.

तसेच तोराळी, देवाचीहट्टी व आमटे येथील मलप्रभा नदीवर बांधलेल्या ब्रिज कम बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने पाण्याचा प्रवाहात वाढ झाली.
पाण्याच्या प्रवाहात अचानकपणे वाढ झाल्याने नदीत बनवलेला पर्यायी रस्ता खचला होता त्यामुळे मागील पंधरा दिवसांपूर्वी देखील रस्ता खचल्याने सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.आता दुसऱ्यांदा पर्यायी रस्ता खचल्याने बेळगाव चोर्ला गोवा रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे