बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य बागायत विकास योजनेच्या जिल्हा पातळीवरील कार्यकारी समितीची आढावा बैठक नुकताच बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये पार पडली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे हे होते. त्यांनी बैठकीमध्ये बागायत अधिकाऱ्यांनी स्वतः प्रांताधिकारी तहसीलदारांच्या समन्वयातून जिल्ह्यातील विविध बागायत क्षेत्रातील जमीन महसूल नोंदणी कागदपत्रे बागायत खात्याच्या नावावर हस्तांतरित करून घ्यावीत.
त्याचप्रमाणे बागायत क्षेत्र व रोपवाटिकांमध्ये उत्कृष्ट दर्जाची फळांची कलमे व रोपट्यांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांना वितरित करण्याची सूचना केली.
जिल्ह्यातील विविध बागायती क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नाबार्ड किंवा इतर संबंधित विभागांना शक्य तितक्या लवकर प्रस्ताव सादर करावा. याचबरोबर बागायत क्षेत्रासह रोपवाटिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना देखील जि. पं. सीईओ शिंदे यांनी केली.
बैठकीस बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनेकेरी, राणी चन्नम्मा बागायत महाविद्यालयाचे डॉ. दिलीप मसुती, कृषी खात्याचे उपसंचालक एच. डी. कोळेकर, पशु संगोपन खात्याचे उपसंचालक रवी सालीगौडर, रेशीम खात्याचे उपसंचालक महेशकुमार वागे, मत्स्य व्यवसाय खात्याचे उपसंचालक संतोष कोप्पद, एपीएमसीचे व्यवस्थापक चबनूर, उद्योग खात्याचे सहाय्यक संचालक ए. आय. पठाण, बागायत खात्याचे सहाय्यक संचालक के. एन. शामंत यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.


