गोकाक शहरातील शाळा-कॉलेजांना ८ दिवसांची सुट्टी जाहीर
बेळगाव लाईव्ह : गोकाक शहरात लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ३० जून २०२५ ते ८ जुलै २०२५ या कालावधीसाठी गोकाक शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काढले आहेत.
गोकाकच्या ग्रामदेवतेची लक्ष्मीदेवी यात्रा ३० जून २०२५ पासून ८ जुलै २०२५ पर्यंत चालणार आहे. या यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुमारे २००० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय गोकाक शहरातील समाज कल्याण विभाग आणि इतर मागासवर्गीय कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये करण्याची विनंती गोकाक शहर पोलीस निरीक्षकांनी केली होती.
सध्या या वसतिगृहांमध्ये विद्यार्थी वास्तव्यास असून, ते शिक्षण घेत आहेत. त्यामुळे, जर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली, तर या वसतिगृहांना पोलीस विभागाच्या ताब्यात देणे शक्य होईल, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक आणि तालुका इतर मागासवर्गीय कल्याण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले होते. या सर्व बाबी विचारात घेऊन आणि गोकाक तहसीलदारांच्या विनंतीनुसार, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गोकाक शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांना सदर कालावधीसाठी सुट्टी जाहीर केली आहे.