बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याच्या त्रिभाजनाची चर्चा वारंवार पुढे येत असतानाच स्वतंत्र गोकाक जिल्ह्याच्या मुद्द्यावरून आज पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुन्हा संकेत दिल्याने गोकाक जिल्ह्याच्या दर्जावरून सुरू असलेल्या हालचालींना आणखी चालना मिळाली आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी गोकाक जिल्हा झाल्यास त्वरित वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मोठी घोषणा केली असून, गोकाक फॉल्सला देशातील पहिले ‘केबल कार’ पर्यटन स्थळ बनवण्याचीही घोषणा केली आहे.
गोकाक तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, बेळगावनंतर सर्वाधिक वेगाने विकसित होणारा भाग म्हणून गोकाक जिल्ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. गोकाक जिल्हा झाल्यास येथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध होईल, त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.
गोकाक फॉल्सच्या विकासासाठी देशातील पहिली ‘केबल कार’ योजना येथे राबवली जाणार आहे. दुबईच्या धर्तीवर सुमारे ५० कोटी रुपये खर्चून ही योजना उभारली जाईल. पर्यटनमंत्री एच.के. पाटील यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले असून, गोकाक फॉल्सला देशातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनवण्याचे लक्ष्य असल्याचेही मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन वर्षांत गोकाक तालुक्यात ७५ टक्के रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. धारवाड-गोकाक-अथणी-गदग हे संपर्क रस्ते विकसित केले जात असून, अरभांवी मठ ते लोकापूरपर्यंत सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. गोकाक येथे उच्च दर्जाचे जिल्हा रुग्णालय उभारण्यासंदर्भात आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांच्याशी चर्चा झाली असून, बेळगाव जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी ही रचना उपयुक्त ठरेल.
तसेच गोकाक बार असोसिएशनसाठी ३ कोटी रुपये खर्चून स्वतंत्र इमारत उभी केली जाणार आहे, तर ४ कोटी रुपये खर्चून तीन मजली ग्रंथालय उभारले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजनही करण्यात येणार आहे. गोकाक लक्ष्मी यात्रेच्या विकासासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, जनतेच्या सहकार्याने गोकाकच्या सर्वांगीण विकासाला गती देता येईल, असा विश्वास मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.


