बेळगाव लाईव्ह :गोकाकची ग्रामदेवता श्री लगमव्वा व श्री द्यामव्वा (महालक्ष्मी) यात्रा ही ऐतिहासिक असून लाखो भाविकांचा सहभाग असणारी ही यात्रा योग्य नियोजनाद्वारे सुरळीत पार पाडा. यात्रा काळात भाविक व जनतेला कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये. तसेच प्रशासनाकडून कोणतीही उणीव राहू नये, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
गोकाक येथील श्री महालक्ष्मी सभागृहामध्ये काल शनिवारी आयोजित यात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष आमदार रमेश जारकीहोळी, सचिव प्रभाकर चव्हाण, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर. बी. बसर्गे आदी उपस्थित होते. गेल्या एक महिन्यापासून गोकाक नगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला अधिक कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांच्या रहदारी बाबत उपायोजना करण्यात आल्या असून भाविकांनीही पोलिसांना सहकार्य करून यात्रा महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहनही मंत्री जारकीहोळी यांनी केले.
बॅनर लावण्याबाबत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश देताना मंत्री म्हणाले की, यात्रा महोत्सव शांततेत पार पडण्यासाठी नगरपालिकेने बॅनर लावणाऱ्यांना परवानगी द्यावी. त्यासाठी कोणालाही आंदोलन करण्याची गरज नसून सर्वजण बॅनर लावू शकतात ही भंडारा यात्रा असल्यामुळे भंडाऱ्याची तपासणी करून विक्रीसाठी परवानगी दिली जात आहे. यात्रेला येणारे भाविक गोकाक धबधबा पाहण्यासाठी जात असल्यामुळे तिथेही जास्त पोलीस कर्मचारी तैनात केले जातील.

यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार रमेश जारकीहोळी यांनी यांनी यावेळी गेल्या तीन दिवसांपासून बॅनरच्या मुद्द्यावरून सुरू असलेले आंदोलन आणि मतभेद माझ्या निदर्शनास आलेले नाहीत. तथापि तालुका व नगरपालिका प्रशासनाने सर्वांना संधी द्यायला हवी असे सांगून जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाला यात्रा कमिटीचे सहकार्य असून ही ऐतिहासिक यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वजण एकजुटीने काम करूया असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, गेल्या वेळी यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी, पार्किंग, खिसेकापू वगैरे समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून यावेळी पोलीस विभागाकडून सुमारे 2500 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून फेस ट्रॅपिंग कॅमेरेही बसवण्यात येत आहेत. यात्रा कमिटीने ड्रोनची व्यवस्था केली असून सार्वजनिक ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे भाविकांना यात्रेचा आनंद लुटण्याची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रा कमिटीचे आभार मानले.
आरोग्य खात्याकडून प्रमुख ठिकाणी प्रथमोपचार आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे आगीच्या घटना टाळण्यासाठी अग्निशामक दल व हेस्कॉम अधिकाऱ्यांना रथयात्रा मार्गावर आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोफत बस वाहतूक, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे सर्व व्यवस्था व्यवस्थित राखण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.


