बेळगाव लाईव्ह :बेळगावसह देशातील इतर राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना पीआय दर्जाच्या खाली असलेल्या कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्यांनी दिवसा चलन काढू नये.
तसेच पीआय दर्जाच्या वरील अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या/खोटे बोलणाऱ्यांना एमव्ही चलन जारी करावे, असा आदेश देण्याचे निर्देश गोव्याच्या एडीजीपींना दिल्याबद्दल भाजप कर्नाटक राज्य उपाध्यक्ष आणि बेळगाव उत्तर मतदारसंघाचे माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत.
यासंदर्भात यापूर्वी माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी 16 जून 2024 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले होते.

या उपक्रमाचा बेळगावमधील पर्यटकांवर लक्षणीय परिणाम होईल आणि दोन्ही राज्यातील लोकांना फायदा होईल. सामान्य लोक आणि व्यावसायिकांची फसवणूक थांबेल, असे त्यांनी नमूद केले होते.
त्याची दखल घेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या एडीजेपींना वरील प्रमाणे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उचललेल्या या पावलामुळे दोन्ही राज्यांमधील संबंध अधिक सुधारून व्यापार, वाणिज्य आणि पर्यटन वाढण्यास मदत होईल, असा विश्वास माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी व्यक्त केला आहे.



