बेळगाव लाईव्ह :माळमारुती पोलिसांनी काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून 51 हजार रुपये किमतीचा 2 किलोहून अधिक गांजा जप्त केला. पोलिसांची धाड पडताच गांजा विक्री करणारे दोन आरोपी फरारी झाले आहेत.
फरारी आरोपींची नावे धीरज श्रीनिवास जांगळे आणि कुलकुले उर्फ भोलेनाथ दादा जांगळे (दोघेही रा. गॅंगवाडी बेळगाव) अशी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
आरोपींपैकी धीरज हा शिवबसवनगर येथे एका सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाड टाकून 26 हजार रुपये किमतीचा 1 किलो 314 ग्रॅम गांजा जप्त केला.
त्याचप्रमाणे भोलेनाथ हा धर्मनाथ भवनाच्या मागील बाजूस गांजा विकत असल्याची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे धाड टाकून 25 हजार रुपये किमतीचा 1 किलो 213 ग्रॅम गांजा जप्त केला.
पोलिसांची धाड पडताच गांजा तेथेच टाकून धीरज जांगळे आणि भोलेनाथ जांगळे यांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.



