बेळगांव लाईव्ह :अनगोळ चौथ्या रेल्वे गेट येथील अंडरपास रस्त्याचे बांधकाम नियम धाब्यावर बसवून घिसाडघाईने सुरू झाले असून हा रस्ता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार केला जावा अशी आमची मागणी आहे आणि जोपर्यंत तो तसा केला जात नाही तोपर्यंत आमचा त्याला विरोध राहील, असे ज्येष्ठ वकील माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी स्पष्ट केले.
अंडरपास रस्त्यासाठी अनगोळचे चौथे रेल्वे गेट वाहतुकीसाठी जवळपास वर्षभर बंद ठेवण्यात येत आहे. यासंदर्भात बेळगाव लाईव्हने प्रतिक्रिया जाणून घेतली असता ॲड. सातेरी बोलत होते. ते म्हणाले की, अनगोळ येथील चौथे रेल्वे गेट रहदारीला बंद करून प्रशासनाने अंडरपास रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असून आमचा त्याला विरोध नाही.
तथापि त्या गेटमधून दररोज अनगोळसह वडगाव, येळ्ळूर, धामणे वगैरे भागातून 400 ते 500 महिला कामगारांसह हजारो कामगार उद्यमबाग येथे कामासाठी येतात. तसेच चौथ्या रेल्वे गेट परिसरात गरीब मध्यमवर्गीयांची वसाहत आहे. त्यांचा कोणीच विचार केलेला नाही. आम्ही त्या ठिकाणचा नकाशा पाहिला असता तेथे जास्तीत जास्त 12 फुट रुंदीचा रस्ता होऊ शकतो, त्यातही दोन्ही बाजूला गटारी झाल्या तर रस्ता केवळ 7-8 फुटाचा होतो.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार प्रत्येक रस्ता किमान 7 मीटर रुंद म्हणजे 21 फुटाचा असला पाहिजे. त्यामध्ये जर दोन्ही बाजूच्या गटारी धरल्या तर रस्ता किमान 18 फुटाचा होऊ शकतो. या पद्धतीने नियोजनबद्ध कामाला सुरुवात न करता चौथ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी घिसाडघाई केली जात आहे. ही बाब अत्यंत धोकादायक, गंभीर असून त्याचे भविष्यात वाईट दुष्परिणाम होतील.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वे गेटच्या ठिकाणचा रस्ता हा महापालिकेचा आहे मात्र पालिकेकडून ना हरकत प्रमाण पत्र न घेताच त्या ठिकाणी अंडरपास रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कोणाच्या दबावाखाली मार्गदर्शक सूची धाब्यावर बसून हे काम केले जात आहे याची आम्हाला कल्पना नाही.
सध्या ज्या पद्धतीने तो अंडरपास रस्ता केला जात आहे त्याला स्थानिकांचाही विरोध आहे आणि शहराचे नागरिक म्हणून आमचाही विरोध आहे. याखेरीस अंडरपास रस्त्याच्या बांधकामासाठी चौथे रेल्वे गेट बंद करण्यात आल्यामुळे त्या मार्गावरील सर्व वाहतुकीचा ताण सध्या तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपूल आणि दुसऱ्या रेल्वे गटाच्या ठिकाणी पडू लागला आहे. विशेष करून तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण वरील वाहतुकीचा ताण वाढल्यामुळे या ठिकाणचा रस्ता खाचखळगे पडून खराब होण्याबरोबरच अपघाताची शक्यता वाढली आहे.
तेंव्हा सदर चौथ्या रेल्वे गेट येथील अंडरपास रस्ता करायचाच असेल तर तो केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार 7 मीटरचा केला जावा अशी मागणी करून यासंदर्भात यापूर्वीच आम्ही रस्ते बांधकामाच्या बाबतीतील केंद्र सरकारची मार्गदर्शक सूची रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेऊन माहिती देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना आमचे म्हणणे पटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी याबाबतीत कोणता निर्णय घेतात हे आम्हाला पहावे लागेल. अन्यथा चौथ्या रेल्वे गेट येथील महाविद्यालयं, उद्योग, व्यवसाय लक्षात घेता सध्या ज्या पद्धतीने अंडरपास केला जात आहे त्याला आमचा कायम विरोध राहील, असे ॲड. नागेश सातेरी यांनी शेवटी स्पष्ट केले


