बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई करत वडगाव धामणे रोडवरील सिद्धारुढ कॉलनी परिसरात दोघांना अटक केली आहे.
गुन्हे विभागाचे एसीपी एस.आर. कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय मणीकंठ पुजारी व त्यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
या छाप्यात प्रथमेश महेश कणबरकर (रा. गणेशपूर गल्ली, शहापूर) आणि अनिकेत ज्ञानेश्वर पोठ (रा. जोशी नगर, शहापूर, बेळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, आरोपींनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५०,५५० रुपये किमतीचा १ किलो ११५ ग्रॅम गांजा तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली ५०,००० रुपये किमतीची एक मोटारसायकल जप्त केली.
शहापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त आणि डीसीपींनी या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.


