बेळगाव लाईव्ह : पाण्याशी मस्ती करू नका कधीही धोका होऊ शकतो असे असताना देखील एका थार चालकाने चक्क धोकादायक वाहत्या नदीच्या पाण्याच्या पुलावरुन कार चालवण्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जीव धोक्यात घालणाऱ्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.
खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हलात्री पुलावर पाणी आल्याने, या भागातील वाहतूक बंद झाली आहे. परंतु काही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून, या पुलावरून आपल्या गाड्या चालवत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणी बॅरिकेट्स लावून किंवा पोलीस बंदोबस्त ठेवून हा रस्ता बंद करण्याची मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मागील वर्षी सुद्धा शहापूर बेळगाव येथील, एका दुचाकी स्वाराने हलात्री पुलावर पाणी आले असताना सुद्धा त्या पाण्यातून आपली स्प्लेंडर कंपनीची दुचाकी गाडी घातली आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर दुचाकी सह तो वाहून गेला, दैव बलवत्तर म्हणून त्याने एका झाडाची फांदी पकडून झाडावर चढून बसला तर त्याची दुचाकी पाण्यातून वाहून गेली. सामाजिक
कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला पाण्यातून बाहेर काढले, त्यामुळे त्याचा जीव वाचला होता हे उदाहरण ताजे असतानाच परत काही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरील पाण्यातून गाड्या घालत आहेत.

बुधवारी त्या नदीच्या पाण्यातून एका थार चालकाने आपला जीव धोक्यात घालून आपली थार गाडी घातली. सुदैवाने नदी पुलावरील पाण्यातून तो सही सलामत बाहेर आला.
त्यासाठी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ता पूर्णपणे बंद करावा किंवा अन्य उपाययोजना करावीत, अन्यथा मोठी दुर्घटना घडून जीवित हानी होण्याची संभाव्यता आहे. सदर थार गाडी पुलावरून जाताना व्हीडिओ व्हायरल झाला असून त्या थार चालकावर कारवाई करा अशी मागणी होऊ लागली आहे.


