बेळगाव लाईव्ह :शेजारील महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. परिणामी जिल्ह्यातील नद्यांच्या परिसरातील गावांमध्ये निर्माण होणारी संभाव्य पूर परिस्थिती समर्पकरीत्या हाताळण्यासाठी सर्व खात्याने एकमेकांमध्ये समन्वय राखून कार्य केले पाहिजे, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल शनिवारी आयोजित जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. महाराष्ट्रातील घाट प्रदेशामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील बहुतेक सर्व जलाशय तुडुंब भरली असून त्यांच्या पाणी पातळीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवला जात आहे.
जिल्ह्यातील पुराचा धोका असलेल्या गावातील लोकांनी जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी केली गेली पाहिजे. जिल्ह्यातील निवारा केंद्रांमधील मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता केली जावी. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या व्याप्तीतील निवाराकेंद्रांना दररोज भेटी देऊन सर्व कांही ठीक असल्याची पाहणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
लोकांना आणि जनावरांना धोक्याची पातळी ओलांडलेल्या नदी, नाल्यांच्या प्रवाह जवळ जाण्यास निर्बंध घातले जावेत. सध्याच्या परिस्थितीत नदी, नाल्यावरील लोकांचा आणि वाहनांचा संचार धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने त्याची पूर्वकल्पना देणारे इशाराचे फलक पुलाच्या ठिकाणी उभारले जावेत. त्याचप्रमाणे आवश्यक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी असेही त्यांनी सुचित केले.
पूर परिस्थिती समर्पकरित्या हाताळण्यासाठी नुकतीच नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नोडल अधिकाऱ्यांनी नियमितपणे बैठका घेऊन संभाव्य पूर परिस्थितीप्रसंगी हाती घ्यावयाच्या खबरदारीच्या उपायांसंदर्भात सिद्धता करावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटक लोकांच्या होणाऱ्या गर्दीप्रसंगी कोणतीही अनाहूत घटना घडणार नाही याची काळजी घेतली जावी. त्यादृष्टीने आवश्यक सुरक्षा क्रम हाती घेतले जावेत, अशी सूचनाही जिल्हाधिकारी रोशनी यांनी केली.
पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी यावेळी बोलताना संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी शहर व्याप्तीमध्ये नियंत्रण कक्षाची (कंट्रोल रूम) स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. बेळगाव शहरात किंवा जिल्ह्यामध्ये पुरा संदर्भात कोणतीही समस्या निर्माण झाली असल्यास नागरिकांनी 112 क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्वरित कार्यवाही केली जाईल, असेही डीसीपी जगदीश यांनी स्पष्ट केले. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन नदी प्रदेशातील गावांमध्ये आवश्यक खबरदारीचे उपाय हाती घेतले जावेत अशी सूचना संबंधित स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असल्याचे सांगून पावसाचा जोर वाढल्यास शाळकरी मुले आपापल्या घरी सुरक्षित पोहोचावी यासाठी शाळा मुख्याध्यापकांनी स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी, असे स्पष्ट केले.
बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी, महापालिका आयुक्त शुभा बी., जि. पं. मुख्य योजना संचालक गंगाधर दिवटर, शिक्षण खात्याच्या उपसंचालिका लीलावती हिरेमठ, बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, बसवराज पाटील आदींसह पोलीस खाते व संबंधित इतर खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सहभाग होता.


