बेळगाव लाईव्ह : मागील पावसाळ्यात खानापूर तालुक्यातील प्रसूती वेदना सुरू झालेल्या एका महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सदर तालुक्याच्या दुर्गम भागातील प्रसूती जवळ आलेल्या गर्भवती महिलांना ताबडतोब प्राधान्याने खानापूर सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
मागील अनुभव लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) आणि खानापूर तालुका आरोग्य अधिकारी (टीएचओ) यांच्यासोबत बैठक बोलावून या भागातील आठवा किंवा नववा महिना सुरू असलेल्या गर्भवती महिलांची संख्या तपासली जावी. तसेच आशा कार्यकर्त्यांशी समन्वय साधून ज्यांच्या अपेक्षित प्रसूती तारखा जवळ येत आहेत अशा महिलांची ओळख पटवली जावी.
त्यानंतर संबंधित सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या अपेक्षित प्रसूतीच्या किमान 5 दिवस आधी रुग्णालयात दाखल करावे, अशी सूचना देणारी सार्वजनिक घोषणा जारी करणे महत्वाचे आहे. ही खबरदारी आवश्यक आहे कारण भीमगड जंगलातील अनेक दुर्गम भागात, भूप्रदेशीय आव्हानांमुळे रुग्णवाहिका किंवा चारचाकी वाहने तेथील नागरी वसाहतीपर्यंत वेळेवर पोहोचू शकत नाहीत.

भूतकाळात वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब झाल्यामुळे प्रसूती वेदना सुरू झालेल्या एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे अशा अनेक दुःखद घटना घडल्या आहेत. याव्यतिरिक्त, कृपया दुचाकीवरून गर्भवती महिलांना प्रवास करण्यास परावृत्त करावे. कारण यामुळे आई आणि बाळ दोघांनाही गंभीर धोका निर्माण होतो. आमगाव येथे अलिकडेच घडलेल्या एका घटनेने हा धोका अधोरेखित केला आहे. आमगाव येथील गर्भवती महिलेला पूर आलेल्या ओढ्यामुळे आणि वाहतूक सुविधांच्या अभावामुळे हॉस्पिटलमध्ये हलवण्यास विलंब झाला होता.
परिणामी तिला मृत्यूला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सदर प्रकरणी आपण गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांशी सक्रिय समन्वय साधत भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडणार नाही त्याची दक्षता घ्यावी, अशा आशयाचा तपशील देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे.