बेळगाव लाईव्ह :मालमत्ता नोंदणीमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अनियमितता रोखण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेने (बीसीसी) ई-खाता अर्ज प्रक्रिया नियुक्त बेळगाव वन सेंटरमध्ये हलवली असून ज्यामुळे भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरणारी अर्ज स्वहस्ते सादर करण्याची (मॅन्युअल सबमिशन) पद्धत बंद झाली आहे.
अलीकडेपर्यंत महापालिकेच्या तीन विभागीय कार्यालयांमध्ये ई-आस्थी नोंदणीसाठी अर्ज मॅन्युअली स्वीकारले जात होते. तथापि त्यातील भ्रष्टाचाराबद्दल नगरसेवकांकडून आलेल्या वाढत्या तक्रारींची दखल घेत महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांनी अचानक तपासणी केली.
त्यावेळी त्यांना असे आढळले की एजंट अर्थात मध्यस्थांना प्राधान्य दिले जात आहे. तर पूर्ण कागदपत्रांसह खरे अर्ज प्रलंबित रहात आहेत. तपासणीनंतर, आयुक्तांनी ताबडतोब मॅन्युअल सबमिशन स्थगित केले आणि सर्व नवीन अर्ज बेळगाव वन सेंटरद्वारे पाठवण्याचे निर्देश दिले.
सध्या, अशी दोन केंद्रे अशोकनगर आणि गोवावेस येथे कार्यरत आहेत. महापालिका कार्यालय आणि कोनवाळ गल्ली येथे लवकरच आणखी दोन केंद्रे सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सुधारित प्रक्रिया नागरिकांसाठी अनुकूल आणि किफायतशीर आहे. अर्जदार आता त्यांची कागदपत्रे थेट केंद्रांवर 25 रुपयांच्या नाममात्र शुल्कात सादर करू शकतात. ज्यामुळे एजंटची गरज भासणार नाही. केंद्रांना थेट पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स देखील देण्यात आले आहेत. एक मोठी कामगिरी करताना, बेळगाव महापालिकेने अलीकडेच प्रलंबित असलेले तब्बल 3,854 ई-खाता अर्ज अवघ्या दोन दिवसात निकालात काढले. यापैकी काही अर्ज तर 6 महिन्यांहून अधिक काळापासून प्रलंबित होत. मात्र तेंव्हापासून सर्व्हर समस्येमुळे प्रक्रिया मंदावली आहे.
“नगरविकास खात्याने सर्व्हर चार दिवसांसाठी बंद राहील असे सांगितले असून त्यापैकी तीन दिवस आधीच निघून गेले आहेत. आम्हाला सर्व्हर समस्येचे लवकरच निराकरण होण्याची अपेक्षा आहे,” असे मनपा आयुक्तांनी सांगितले.
जागरूकता वाढवण्यासाठी, महापालिकेने राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे एक कॅन्टीलिव्हर बोर्डही बसवला असून ज्यामध्ये ए-खाता आणि बी-खाता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सूचीबद्ध आहेत. नागरिकांचे प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी एक हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे, परंतु त्यावरील बरेच कॉल ई-खात्याशी संबंधित नसल्यामुळे त्याची प्रभावीता कमी होत असल्याची कबुली मनपा आयुक्तांनी दिली.
स्रोत: टाइम्स ऑफ इंडिया